झिराडमध्ये मारहाण; दिलीप भोईरविरोधात गुन्हा दाखल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील झिराड येथे शनिवारी (दि.18) सायंकाळी झालेल्या किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केल्याप्रकरणी दिलीप भोईर यांच्यासह त्यांचा मुलगा राहूल व अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोघांनीही झिराड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल केला असून डीवायएसपी कदम अधिक तपास करीत आहेत.

नितिश भावे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, शनिवारी सायंकाळी दिलीप भोईर यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये त्यांच्या बहिणीच्या स्कूटीचे चाक अडकले होते. याबाबत नितिश भावे यांनी ट्रक चालक जयवंत गायकवाड यांना विचारणा केली असता त्यांनी नितिश भावे यांना शिविगाळ केली. तसेच दिलीप भोईर यांनी शाब्दिक बाचाबाची सुरु असताना नितिशला बेदम मारहाण केली. याशिवाय भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुयश भावे यालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विक्रम साळुंखे, राहूल दिलीप भोईर, अमृत म्हात्रे, दिलीप भोईर, विनया साळुंखे, जयवंत गायकवाड यांच्याविरोधात झिराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच जयवंत गायडवाड यांच्या फिर्यादीनूसार नितिश भावे, प्रणव भावे, सुयश भावे, सुशांत भावे, राजेश भावे यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे झिराड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दिलीप भोईर यांच्याबाबत नाराजी
लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरत असताना गावात शांतता व सुव्यवस्था ठेवणे गरजेचे असते. मात्र दिलीप भोईर यांनी किरकोळ शाब्दिक वादाचे मारहाणीत रुपांतर केले. त्यामुळे नागरिकांकडून दिलीप भोईर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


Exit mobile version