पर्यटन विकास कार्यक्रमातून निधी उपल्बध
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील पुरातन गाव तलावाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. तलावातील गाळ काढणे आणि संरक्षण भिंत बांधण्याची कामे राज्य सरकारच्या पर्यटन विकास कार्यक्रमातून सुरु आहेत.साधारण पाच एकर जमिनीमध्ये वसलेल्या या तलावाचे पाणी पूर्वी पोशीर गावाची तहान भागवत होते. दरम्यान, हे तलाव आता पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ दिलीप राणे यांच्या प्रयत्नांना माजी आमदार सुरेश लाड यांची साथ मिळाल्याने यशस्वी होत आहे.
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीच्या पोशीर गावामध्ये गावाच्या वेशीवर गाव तलाव आहे. नळपाणी योजना अस्तित्वात नव्हत्या त्यावेळी हेच गाव तलाव पोशीर गावातील ग्रामस्थांची तहान भागवत होते. कालांतराने साळोख पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्यात आल्यानंतर देखील काही वर्षे येथील विहिरींमधील पाणी वापरले जात होते. परंतु, विहिरीतील दूषित पाण्यामुळे ती योजना बारगळली आणि उल्हास नदीवरून पाणी गावात आणले गेले. काही वर्षांपूर्वी या गाव तलावाची स्वच्छता करताना त्यातील गाळ आणि माती काढण्यात आली होती.
या गाव तलावाचे सुशोभीकरण आणि तलाव परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे यासाठी ग्रामस्थ दिलीप राणे यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यासंदर्भात त्यांनी मंत्रालयात प्रस्ताव देखील पाठवला होता. मात्र, मंत्रालय स्तरावर असलेल्या फाईल बद्दल माजी आमदार सुरेश लाड यांना कळताच त्यांनी तात्काळ हा प्रस्ताव राज्याचे पर्यटन मंत्र्यांकडे दिला. अखेर पोशीर गाव तलावाच्या सुशिभिकरणासाठी राज्याचे पर्यटन विकास कार्यक्रमातून दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्या निधीमधून या तलावाचे सुशोभीकरणाच्या काम सुरु झाले आहे.
गाव तलावाचे रूपडे बदलणार
गाव तलावाच्या कडेने संरक्षण भिंत बांधली जात असून तलावातील गाळ आणि माती गेल्या दीड महिन्यापांसून काढली जात आहे. त्याचवेळी तलावाच्या मध्यभागी असलेले पाण्याचे नैसर्गिक झरे जिवंत ठेवण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले आहेत. तलावाच्या सुशोभीकरणामुळे पोशीर गाव तलावाला नवीन रूप येत आहे. तलावाचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण झाल्यावर पोशीर गावाला एक नवीन ओळख मिळणार असून पर्यटाकांचा देखील या ठिकाणी ओघ वाढेल, अशी चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.
पोशीर गाव तलावावर आजुबाजुंच्या गावातील लोक यावेत आणि काही वेळ व्यतीत करावा, असे सुशिभिकरण करायचे आहे. तलावातील गाळ काढण्यात आला असून आता तलावाच्या सभोवताली पेव्हर ब्लॉक रस्ता आणि बसायला बाकडे आणि विजेची रोषणाई करायची आहे. त्या कामासाठी माजी आमदार सुरेश लाड यांच्या माध्यमातून निधी मिळावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
दिलीप राणे,
ग्रामस्थ







