| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोल्हारे येथे असलेल्या तीन नद्यांच्या संगमावर संरक्षण भिंत, दशक्रिया विधी घाट, पुरातन मंदिराकडे जाणारा पूल अशी कामे सुशिभिकरण अंतर्गत मंजूर आहे. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने ते काम अपूर्ण अवस्थेत आहे. दरम्यान, तेथे दोन महिन्यापूर्वी पसरलेली खडी यातून वाट काढणे सध्या सर्वांना कठीण जात आहे.
नेरळ जवळील कोल्हारे येथे उल्हास, चिल्हार आणि पेज अशा तीन नद्यांचा संगम होतो. त्यामुळे हे स्थान महत्वाचे समजले जाते, त्यात त्या संगमावर पुरातन शिवमंदिर असून ते मंदिर पांडवकालीन असल्याचे अवशेष आहेत. त्यामुळे दशक्रिया विधी कार्यासाठी हे संगमेश्वर स्थान महत्वाचे समजले जाते. तेथे परिसरातील 50हून अधिक गावातील लोक दशक्रिया विधीसाठी तर श्रावण महिन्यात असंख्य भाविक आणि शिवरात्रीचे सोहळ्याला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा या पुरातन स्थळ परिसराचे सुशोभीकरण करण्याचे कामासाठी सव्वा कोटींचा निधी मंजूर असून, त्यात नदीच्या कडेला येथील बहिरीनाथ मंदिर समोर संरक्षण भिंत आणि नदीमध्ये दशक्रिया विधी घाट तसेच कितीही पाऊस असेल तरी मंदिरात जाता यावे यासाठी लहान पूल बांधला जाणार आहे. ही सर्व कामे गेली वर्षभर सुरू असून, मागील दोन महिन्यापासून येथे सुरू असलेली सर्व कामे बंद आहेत. मार्च महिन्यात या कामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने ठेकेदाराने काम बंद करून टाकले आहे. शासनाने कर्जत तालुक्यातील विकास कामांना निधी दिलेला नाही आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील असंख्य विकासकाम बंद पडली आहे.
कोल्हारे संगमावरील सुशोभिकरणाची कामे रखडली
