| सुधागड-पाली | वार्ताहर |
फुलपाखरु,
छान किती दिसते,
या वेलींवर फुलांबरोबर
गोड किती हसते फुलपाखरु..
लहानपणी बालभारतीत कवी ग.हा.पाटील या कवीने लिहिलेल्या आणि शाळेतील शिक्षकांनी गोड आवाजात शिकविलेल्या कवितेच्या या ओळी आजही तोंडपाठ असणारी मंडळी भरपूर आहेत. कवितेतील वर्णनाप्रमाणे श्रावणातील सुंदरशा वातावरणात देखील अशीच सुंदर फुलपाखरं हवेत बागडू लागलेली आहेत. त्यात रायगडात राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनचा सर्वत्र मुक्त संचार पहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमी व फुलपाखरू निरीक्षक सुखावले आहेत.
जंगलात, बागा घराच्या शेजारील झाडांवर ब्लू मॉरमॉन उडतांना दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे. लहान मुलांना तर हे फुलपाखरू पाहून खूप आनंद होतो. हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू आहे. ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. पंखा खालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. 22 जून, 2015 रोजी राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
मुबलक निसर्गसंपदा, पश्चिम घाटाचा पट्टा व पोषक वातावरण यामुळे जिल्ह्यात फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू बहुतांश ठिकाणी दिसते. फुलपाखरांसाठी जिल्ह्यात सुरक्षित पर्यावरण आहे. इथे फुलपाखरु व त्यांच्या विविध अवस्थांचे निरीक्षण करण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात.
– राम मुंढे, निसर्ग व पक्षी अभ्यासक, विळे-माणगाव
आकाराने मोठी अन देखणी
हे फुलपाखरू स्वालोटेल्स या जातीत येते. या प्रकारची फुलपाखरे आकाराने मोठी, अतिशय आकर्षक रंगाची आणि पंखाच्या शेवटी शेपटीसारखे टोक असणारी असतात. यांचा जीवनक्रम हा लिंबाच्या जातीच्या झाडांवर आणि इतर काही झाडांवर होतो. जंगलामधे फुलांवर किंवा त्यापेक्षा एखाद्या ओलसर मातीच्या भागावर ते सहज आकर्षित होते. मातीवर बसून ते क्षार शोषून घेते.
