। राबगाव/पाली । वार्ताहर ।
पश्चिम घाटाचा मोठा पट्टा, मुबलक झाडेझुडपे व निसर्ग संपदा, पोषक वातावरण, 240 किमीचा विस्तीर्ण समुद्र किनारा, कांदळवने व अभयारण्य या सर्वांगीण प्रतिकूल परिस्थितीमूळे जिल्ह्यात रंगीबेरंगी फुलपाखरांचे नंदनवन फुलले आहे. सध्या ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुलपाखरू उडताना व बागडतांना दिसत आहेत.

फुलपाखरांच्या तब्बल 147 प्रजाती जिल्ह्यात आढळतात. 1 ते 30 सप्टेंबर देशात तिसरा फुलपाखरू महोत्सव सुरु आहे. अलिबाग येथील निसर्ग, फुलपाखरू व प्राणीपक्षी अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले की जगात फुलपाखरांच्या सुमारे 17,500 जाती आहेत. भारतात फुलपाखरांच्या सुमारे 1500 जाती तर महाराष्ट्रात सुमारे 345 जाती आढळून येतात. त्यातील तब्बल 147 प्रजाती एकट्या रायगड जिल्ह्यात आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रेट एगफ्लाय, रथिंडा आमोर, युप्लॉईया कोर, कॉमन मॉरमॉन, कॉमन लियोपार्ड, कॉमन पियरोट अशा विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश आहे.
फूड प्लांट येथे आढळतात त्यास होस्ट प्लांट असेही म्हणतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. त्यामध्ये कडूनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब, अशोकफ अशी झाडे येतात. सोनटक्का, पानफुटी अशा छोट्या झाडांवरही ग्रास डीमन, रेड पियरो अशी सुंदर फुलपाखरे वाढतात. असेही कवळे यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी तणनाशकांच्या वापराचे प्रमाण फुलपाखरांच्या अळ्या, सुरवंट व फुलपाखरांना धोकादायक ठरत आहेत असेही कवळे म्हणाले. भविष्यात जिल्ह्यात फुलपाखरांचे उद्यान होण्यास खूप पोषक परिस्थिती आहे.
– राम मुंढे, निसर्ग व पक्षी अभ्यासक, विळेकाही दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील पाटणूस जवळ माळरानावर एका छोट्या झाडावर कॅबेज व्हाईट या जातीची असंख्य फुलपाखरे अंडी देतांना जमलेली दिसली. जिल्ह्यात फुलपाखरांसाठी पोषक पर्यावरण आहे. जिल्ह्यातील फुलपाखरांचे संवर्धन झाले पाहिजे. तसेच या फुलपाखरांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.
– राम मुंढे, निसर्ग व पक्षी अभ्यासक, विळे
पश्चिम घाटाचा बहुसंख्य भाग आणि प्रतिकूल निसर्ग यामुळे जिल्ह्यात फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. कांदळवनात देखील फुलपाखरे आढळतात. या फुलपाखरांच्या अधिवसाचे संवर्धन होणे आवश्यक आहे
– समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, अलिबाग
होस्ट प्लांटला मागणी
तिनविरा धरणाजवळ खास फुलपाखरांसाठी खाजगी उद्यान केले आहे. तसेच फुलपाखरांचे होस्ट प्लांट असलेल्या झाडांना सध्या अधिक मागणी आहे. लोक आपल्या परसबागेत किंवा खास फुलपाखरांसाठी छोटे उद्यान करून तेथे ही झाडे लावतात व फुलपाखरांना आकर्षित करतात. आणि विविध रंगेबिरंगी फुलपाखरांचे निरीक्षण करतात. बच्चे कंपनी देखील आंनद लुटले. असे पालीतील ग्रीनटच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांनी सांगितले