कोहलीमुळेच क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

2024 पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप झाला असून आता 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची तयारी सुरू होत असून या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच ऑलिम्पिक संचालक निकोलो कॅम्प्रियानी यांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत चर्चा केली होती. तसेच, लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश का करण्यात आला, हेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऑलिम्पिक संचालक निकोलो कॅम्प्रियानी म्हणाले की, जगभरातील सुमारे 2.5 अब्ज लोक क्रिकेट पाहतात. हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. याचे ऑलिम्पिकमध्ये स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पुढे ते म्हणाले की, आम्हाला अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे आहे. विराट कोहली घ्या. तो सोशल मीडियावर जगातील तिसरा सर्वाधिक फॉलो केला जाणारा अ‍ॅथलीट आहे. लेब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वुड्स यांच्यापेक्षा विराट कोहलीला जास्त लोक फॉलो करतात. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1900 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. पण त्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एकच सामना खेळला गेला. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पुन्हा खेळले गेले नाही.

Exit mobile version