| अलिबाग | प्रतिनिधी |
पोलीस दलात होणारी भरती ही पारदर्शक, नियमांना धरून केली जाणार आहे. त्यामुळे भरती होणार्या उमेदवारांनी आपल्या हिमतीवर आणि बुद्धी कौशल्याने पोलीस दलात सामील व्हा. पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतःचे नुकसान करू नका, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना केले आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकाधिक तरुण तरुणींनी या पोलीस दलात सामील होण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर 2022 चे आयोजन, अलिबाग पोलीस परेड मैदानावर एक दिवसासाठी आयोजित केले होते. उमेदवाराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपस्थित तरुण-तरुणींना मार्गदर्शन केले. यावेळी घार्गे यांनी पैसे देऊन अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.
बर्याच वेळा दुर्गम भागातील युवक-युवतींना पोलीस भरतीबाबत योग्य ती माहिती नसल्यामुळे ते पोलीस भरतीमध्ये सहभागी होत नाहीत किंवा पोलीस भरतीमध्ये जरी सहभागी झाले तरी त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या आवश्यक तयारीमध्ये कमी पडतात. याकरिता स्थानिक पातळीवरील तसेच दुर्गम भागातील होतकरू युवक-युवतींना भरती प्रक्रियेबाबत पूर्णपणे माहिती व्हावी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरीता सदर पोलीस भरती मागदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे यांनी पोलीस मुख्यालय अलिबाग रायगड येथे आयोजित शिबिरास प्रत्यक्ष उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन केले. उपस्थित सर्व युवक-युवतींना स्वतः मार्गदर्शन केले, तसेच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहर्ष सहभाग घेण्याबाबत प्रोत्साहित केले.
पोलीस दलात सामील होणार्या तरुण तरुणीला भरतीचे नियम, मैदानी चाचणी, लेखी परीक्षाबाबत मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात आले. लेखी परीक्षेत बेसिक अभ्यासावर भर देणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीत कशा पद्धतीने उमेदवार याला मार्क मिळू शकतात. याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले गेले. त्यामुळे भरती वेळी उमेदवारांना याचा अधिक लाभ होऊन मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील उमेदवार दलात सामील होण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आठ उपविभागीय अधीक्षक विभागात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले गेले होते. साधारण आठ ते दहा हजार उमेदवार या शिबिरात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुले मुली यांनी पोलीस दलात सामील व्हावे, यादृष्टीने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात लेखी परीक्षा, मैदानी चाचणी कशा पद्धतीने असते. याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
भरती प्रक्रिया किती पारदर्शक होणार, याबाबतही सांगितले असून कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. तरुणांनी आपल्या हिंमतीवर दलात सामील व्हावे लागणार आहे.
सोमनाथ घार्गे
जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड
आठ विभागात शिबीर
शनिवारी सकाळी आठ ते सायं. 05.00 वाजेपर्यंत रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड अशा एकूण आठ विभागात युवक-युवतींकरीता पोलीस भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास 2000 ते 2500 युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदविला.