बीड बुद्रुक पाणी योजना रखडली

जुन्या नळपाणी योजनेवर आजही स्थानिक अवलंबून

। नेरळ। प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील 550 घरांची वस्ती असलेल्या बीड बुद्रुक गावातील नळपाणी योजनेचे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. 1997 च्या जुन्या नळपाणी योजनेवर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जलजीवन मिशनमधून मंजूर झालेल्या 99 लाख रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. नव्याने बनविण्यात येणार्‍या नळपाणी योजनेचा जलकुंभ लोकसंख्येला पुरेसे नाही आणि नादुरुस्त विहिरीमधून नवीन नळपाणी योजनेचे उद्भव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नळपाणी योजना बारगळल्याचे चित्र आहे.

बीड हे गाव कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव समजले जाते. 550 हुन अधिक घरांची वस्ती असलेल्या या गावात 2018 मध्ये दुसरी नळपाणी योजना राबविली गेली होती. त्या योजनेचे उद्भव विहीर हि उल्हास नदीवरील पिंपळ डोह येथे आहे. मात्र त्या ठिकाणी नदी पात्रात असलेल्या 5 फूट बंदिस्त बंधार्‍यामुळे असलेल्या विहिरीचे ठिकाणी उल्हास नदीचे प्रवाहाचे पात्र वेगळ्या दिशेने वाहू लागले आहे. त्यामुळे नळपाणी योजनेच्या पाण्यावर परिणाम झाला आहे.

जून 2021 पासून या नळपाणी योजनेचे काम सुरु असून या नळपाणी योजनेचे काम अनेक महिने बंद होते. सध्या केवळ जलकुंभ उभे असून ते जलकुंभदेखील अपूर्ण अवस्थेत आहे. त्याशिवाय या नळपाणी योजनेचे कोणतेही काम म्हणावे तसे पूर्ण झालेले नाही. या गावाची लोकसंख्या लक्षात घेता नळपाणी योजनांमध्ये 550 घरगुती नळजोडणी यांचा अंतर्भाव करून घेण्याची आवश्यकता होती. घरगुती 305 नळजोडण्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे या नळपाणी योजनेचे पाणी गावातील प्रत्येक घरात जाण्याची शक्यता कमीच आहे. जुन्या नळपाणी योजनेत तब्बल 140 घरे ही सार्वजनिक स्टॅन्ड पोस्ट आणि उरलेली 165 वैयक्तिक पाणी पुरवठ्यासाठी होती. नवीन योजनेत 67 घरांचाच स्टॅन्ड पोस्टसाठी समावेश केला आहे. असे मिळून 372 घरांना पाणी पुरवठा होईल मग उरलेल्या घरांनी करायचे काय? घरात नळ आला नाही तर पाणी भरायला जायचे कुठे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विविध कारणांनी या नळपाणी योजनेचे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. मुदतवाढ देऊनदेखील पाणी योजना पूर्ण होत नाही आणि आणखी काही महिने योजनेचे काम पूर्ण होणार नाही अशी तेथील कामांची स्थिती आहे.

या योजनेचे गौडबंगाल म्हणजे या योजनेत नवीन उद्भव विहीर कुठे असणार आहे. याची अधिकारी काहीही माहिती देत नाही. जुन्या नळपाणी योजनेची उल्हास नदीमध्ये असलेली उद्भव विहीर पावसाळ्यात उल्हास नदीला महापूर आल्यास वाहून जाण्याची शक्यता आहे. कारण जुन्या नळपाणी योजनेची विहीर ज्या पिंपळडोह येथे आहे. तेथे उल्हास नदीच्या पाण्याचा प्रवाह मागील काही वर्षात बदलला गेला आहे. जुन्या नळपाणी योजनेची विहीर धोक्यात आली असून नवीन पाण्याच्या योजनेची विहीरदेखील तिच असल्याची कुजबूज यावेळी स्थानिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे तसे असल्यास बीड गावाची नळपाणी योजना सुरु होण्याआधी बंद पडण्याची शक्यता आहे. उद्भव विहीर ते जलकुंभ या दरम्यानच्या दीड किलोमीटर पाईपलाईनसाठी अंदाजपत्रकात 14 लाखांची तरतूद आहे. अद्याप त्या ठिकाणी एकही पाईप टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे पाईपलाईनसाठी असलेल्या निधीचा अपहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलजीवन मिशनची ही योजना पूर्ण होण्याआधी अडचणीत आली आहे.

काही महिने तालुक्यात दगडखाण यांचा तसेच माल पुरवठादार यांचा संप सुरू होता.त्यामुळे साहित्याची वाहतूक वेळेवर झाली नाही.परिणामी बीड नळपाणी योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. या योजनेच्या कामाला मुदतवाढ मिळाली असून पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

अनिल मेटकरी,
उप अभियंता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग
Exit mobile version