नळपाणी योजनेचे भूमीपूजन
47 लाखांचे अनुदान मंजूर
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील वरई ग्रामपंचायतीमधील वरई आणि इंजिवली या गावासाठी नळपाणी योजना मंजूर झाली आहे. 47 लाख रुपये खर्चाच्या या नळपाणी योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. 800 लोकवस्ती असलेल्या या दोन्ही गावात नळपाणी योजनेचे पाणी घरोघरी नळजोडणी करून दिले जाणार आहे.
तालुक्यातील वरई आणि इंजिवली या गावातील लोकांसाठी असलेली नळपाणी योजना जुनी झाली आहे. या योजनेचे पाणी अपुरे पडत असल्याने रायगड जिल्हा परिषदेकडे वरई ग्रामपंचायतीने नळपाणी योजना मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन गावांची नळपाणी योजना मंजूर केली असून, त्या योजनेसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 47 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. दहिगाव येथील सिमनेत बंधार्याजवळ असलेल्या विहिरीच्या पाण्यावर ही योजना तयार करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 25,000 लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बनविण्यात येणार असून, त्या जलकुंभातून नळाचे पाणी वरई आणि इंजिवली या दोन्ही गावात दिले जाणार आहे.
या नळपाणी योजनेचे भूमीपूजन माजी सरपंच शंकर भुसारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश फराट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. त्यात ग्रामस्थ वासुदेव भुसारी, अर्जुन भुसारी, दीपक भुसारी, भानुदास ठाकरे, देवराम जाधव, प्रकाश देशमुख, रवींद्र मांडे, अरुण देशमुख, पोलीस पाटील हनुमान भुसारी आदी उपस्थित होते.