| पनवेल | प्रतिनिधी |
पोलीस असल्याची बतावणी करून दोन तोतया पोलिसांनी एका महिलेचे तब्बल 4 लाख 80 हजारांचे दागिने लुबाडून पलायन केल्याची घटना खांदा कॉलनी, सेक्टर -9 मध्ये घडली. या घटनेतील तक्रारदार महिला खांदा कॉलनीमध्ये राहण्यास असून, खांदा कॉलनी सेक्टर 9 मधील खांदेश्वर सोसायटी परिसरातून जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून त्यांच्याजवळ आलेल्या दोघांनी ते पोलीस अधिकारी असल्याचे भासवून महिलेला घाबरवले. त्यानंतर त्यांनी पुढे काहीतरी मोठी गडबड झाल्याचे सांगून महिलेला अंगावरील दागिने काढून सुरक्षित ठेवण्यास बजावले. तोतया पोलिसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने आपल्या अंगावरील 4 लाख 80 हजारांचे दागिने काढले असता, एकाने त्यांचे दागिने व्यवस्थित बांधून देण्याचा बहाणा करून आपल्याकडे घेतले. या चोरांनी हातचलाखी करून त्यांचे सर्व दागिने काढून घेतले आणि रिकामा कागद त्यांना देऊन तेथून पळ काढला.







