| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गेली 10-12 वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही नवीन ठेकेदाराने आम्हाला कामावरून काढून टाकले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकावे आणि आमच्या दोन वेळच्या जेवणाची व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी अत्यंत हृदयद्रावक आणि संतप्त मागणी श्रीवर्धन नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांनी पोलिसांकडे केली आहे. कामगारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मनसेने या प्रकरणात उडी घेतली असून, प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
श्रीवर्धन नगरपालिकेत गेल्या 10 ते 12 वर्षांपासून काही कंत्राटी सफाई कामगार हातावरचे पोट घेऊन काम करत होते. मात्र, नगरपालिकेत नवीन आलेल्या ठेकेदाराने या स्थानिक व जुन्या कामगारांना कामावर न घेता, परस्पर बाहेरून नवीन कामगार आणले आहेत. त्यामुळे त्यांचा एकमेव रोजगाराचा साधन हिरावला गेला आहे. या अन्यायाविरोधात संतप्त झालेल्या मंगेश बांद्रे, मिनाक्षी बांद्रे, प्रकाश साखरे, प्रियांका साखरे, सुनिल चिमण आणि सुजित पवार या कामगारांनी थेट श्रीवर्धन पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले आहे. “आम्हाला कुठेही लगेच दुसरी नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने आजच आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकावे, जेणेकरून रात्रीच्या जेवणाची तरी व्यवस्था होईल,” अशी उद्विग्न मागणी या कामगारांनी पत्रात केली आहे. “गरीब आणि अशिक्षित कामगारांवर कुणीही दबावाचे राजकारण करू नये, मनसे न्याय मिळेपर्यंत हा लढा सोडणार नाही,” असा आक्रमक इशारा देखील मनसे तालुकाध्यक्ष मृदास तोंडलेकर यांनी दिला आहे.







