| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील अनेक गावे पावसाळ्याच्या दिवसात अंधारात चाचपडत असतानाचे दूश्य समोर येत आहे. यासंदर्भात उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांनी उरण येथील महावितरण कार्यालयाला गुरुवारी (दि.9) भेट देऊन विद्युत पुरवठा वारंवार का खंडित होतो, याचा आढावा घेतला. तसेच, महावितरण कार्यालयाचे उप अभियंता विकास गायकवाड यांनी स्वतः जातीने लक्ष घालून तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सुचित केले. उरणच्या आमसभेत आवाज उठवूनही महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावांत 40 वर्षांपूर्वीचे जिर्ण झालेले विद्युत वाहक लोखंडी पोल, विद्युत तारा जैसे थे स्थितीत आहेत.त्यामुळे तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महावितरण कंपनीच्या चाणजे विभागातील काही कामचुकार अधिकारी वर्गामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे देखील स्थानिकांमधून बोलले जात आहे.






