| महाड | प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील शिरगाव चेकपोस्ट परिसरात गोवंशीय मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 65 किलो मांस व एक चारचाकी वाहन जप्त केले असून, दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 15) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीत जफर अब्दुल मज्जीद गिते रा. जुई मोहल्ला, जुई महाड. आणि शहेबाज अब्दुल्ला मुंडे रा. जुई, महाड. यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. संशयितांकडून सुमारे 16 हजार 250 रुपये किंमतीचे अंदाजे 65 किलो गोवंशीय मांस तसेच सुमारे एक लाख रुपये किंमतीचे महिंद्रा जितो कंपनीचे वाहन असा एकूण 1 लाख 16 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात संबंधित मांस विक्रीच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे करीत आहेत. हिंदूंच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशीच घडलेल्या या संवेदनशील स्वरूपाच्या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलीस कारवाईची माहिती मिळताच मोठ्या संख्येने गोरक्षक शिरगाव चेकपोस्ट नाक्यावर जमा झाले होते, दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी गोरक्षकांकडून करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
