गोमांस विक्री करणार्‍याला अटक

। पनवेल । वार्ताहर ।
गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांच्या अवयवांचे तुकडे करणार्‍यांची तळोजा पोलिसांनी धरपकड केली. या धरपकडीदरम्यान एक व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला असून इतर पाच जण पळून गेले. पोलिसांनी सदर ठिकाणावरून गोमांसाच्या अवयवांचे तुकडे व ते कापण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त केली आहेत. या कारवाईत पोलिसांनी 3 बैल, 1 गाय आणि 2 वासरूंना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.

तळोजा गावातील नोफिल हुस्नेन पटेल यांच्या घराजवळ काही व्यक्ती गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे व त्यांच्या पथकाने तळोजा गावात नोफिल पटेल यांच्या घराजवळ पहाणी केली असता, सदर ठिकाणी सहा व्यक्ती हातात सत्तुर, चाकू घेऊन एका गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची धरपकड केली असता, सर्वजण त्याठिकाणावरून पळून गेले, मात्र त्यातील इम्रान अब्दुल अजीज पटेल (43) हा पळून जाताना खाली पडल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला.

Exit mobile version