मासळीच्या पहिल्या हंगामाला सुरूवात

मुरूड मार्केटमध्ये खवयांची गर्दी

| मुरूड | वार्ताहर |

नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण करून मुरूड, राजपुरींचे पारंपरिक मच्छिमार मंगळवारी पहाटेपासून समुद्रात मासेमारीस रवाना झाले. पहिल्याच प्रयत्नात बोंबील, कोलंबी, मांदेली आदी मासळी स्थानिक मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे बुधवारी सकाळी मुरूड मार्केटमध्ये दिसून आले. यामुळे बोंबील आणि कोलंबी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी दिसत होती.

बोंबील अधिक प्रमाणात आल्याने वाटा 50 रूपयांना मिळत होता, तर कोलंबी 100 रूपये वाट्याने मिळत होती. चैती, टायनी सोलट आदी प्रकाराततील कोलंबीदेखील आल्याने खवय्यांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली. पापलेट, जिताडा, रावस आदी प्रकारातील मोठी मासळी काही प्रमाणात दिसून आली. राजपुरी येथून अधिक प्रमाणात बोंबील विक्रीस आल्याचे सांगण्यात आले. मुरूड, शिघ्रे, खारआंबोली, नांदगाव, विहूर, तेलवडे, उंडरगाव पंचक्रोशीतील गावांतूनदेखील दुपारी कोळी महिला बोंबील, कोलंबी विक्रीसाठी गावागावातून फिरताना दिसत होत्या. श्रावण असल्याने चिकन, मटण खात नसल्याने मासळीला वाढती मागणी असल्याचे अनेक खवय्यांनी सांगितले. मुरूड मार्केट परिसरात अनेक कोळी महिला बोंबील विक्रीसाठी ठाण मांडून बसल्या होत्या.

पहिल्याच हंगामात सोलट कोलंबी मिळू लागली आहे. दिघी, मुरूड, एकदरा राजपुरीच्या मच्छिमारांना सोलट कोलंबीची पलटी मिळाल्याने मच्छिमार सुखावले आहेत. सोलट कोलंबी मिळण्याचे प्रमाण कमी जास्त असल्याने ‌‘कभी खुशी कभी गम’ असा प्रकारदेखील दिसून आला. आजमितीला सोलट कोलंबी 500 रूपये किलोने विकली जाते. बोंबील, कोलंबी खरेदीसाठी काही जणांनी थेट राजपुरी बंदर गाठून अधिक स्वस्त मासळी खरेदी केली. हवामानात सातत्याने बदल होत असल्याने मासेमारी बेभरवशाची बनल्याचे कोळी समाजातील कार्यकर्ते बाळकृष्ण गोंजी यांनी सांगितले. त्यामुळे मासळीचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. दिघी खाडीत सध्या सोलट कोलंबी मिळत असून अन्य बंदरापेक्षा अधिक प्रमाणात मिळत असल्याचे समजले.

Exit mobile version