। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून मासेमारी बंदीमुळे पर्ससीननेट मासेमारी बंद होती. मात्र, 1 सप्टेंबरपासून पुन्हा पर्ससीननेट मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पर्ससीननेटधारक तयारीला लागले असून, त्यांची धावपळ सुरू झालेली आहे.
गतवर्षीचा मासेमारी हंगामामध्ये पर्ससीन मासेमारी सततच्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे पर्ससीननेट नौका मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. खरंतर खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरुवात होते. मात्र, पर्ससीननेट मासेमारीला 1 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलेली असते. आठवडाभरानंतर पर्ससीननेट मासेमारांची प्रतीक्षा संपणार आहे. खोल समुद्रातील मासेमारी सुरू झालेली असली तरी पावसामुळे समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रामध्ये उसळलेल्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला जोरदार वारा, अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागत आहे.
या परिस्थितीमध्ये पर्ससीननेट वगळता इतर यांत्रिकी होड्या, बिगर यांत्रिकी नौका नव्या हंगामाला सामोरे जात आहेत. मात्र, पर्ससीन नेट मासेमारी सुरू होण्यासाठी आठवडाभराचा अवधी असल्याने नौकांची डागडुजी, रंगरंगोटी आणि जाळ्यांची कामे सुरू आहेत.
चारच महिने पर्ससीननेट मासेमारी
पर्ससीननेट मासेमारीला 1 सप्टेंबरपासून सुरुवात होते. मात्र, शासनाच्या आदेशाप्रमाणे 31 डिसेंबरपर्यंतच मासेमारी करता येते. यानंतर पर्ससीननेट मासेमारी बंद ठेवण्यात येते. हा बंदी कालावधी 1 जानेवारी ते 31 ऑगस्टपर्यंत असतो. त्यामुळे पर्ससीननेट मासेमारीला केवळ चारच महिने कालावधी मिळतो. तर इतर मासेमारी करणार्या नौकांना 10 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे.
नेपाळी खलाशांचा भरणा
स्थानिक खलाशी मिळण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व अन्य राज्यांतील खलाशी घेण्यात येतात. मागील पाच-सहा वर्षापासून पर्ससीन नौका वाढल्याने खलाशांची संख्याही वाढलेली आहे. त्यासाठी आपल्या देशाच्या सीमेपलीकडील नेपाळहून खलाशी आणले जातात. त्यामुळे पर्ससीन नौकांवर नेपाळी खलाशांचा भरणा अधिक आहे.