पापड, कुरडया, सांडगे, लोणची, मसाले आदी पदार्थांची जंत्री
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
भारतीय खाद्य संस्कृतीत विविध लज्जतदार पदार्थांना विशेष महत्व आहे. त्यातच पावसाळ्यातील बेगमीसाठी उन्हाळ्यात करण्यात येणार्या विविध पदार्थांची जंत्रीच आहे. कोरोना काळात मागील दोन वर्षे ही लगबग पहायला मिळाली नाही. मात्र आता जिल्ह्यात घराघरात ही लगबग दिसत आहे. तसेच अगोटीला देखील सुरुवात झाली आहे. बाजारात कडधान्य व सुकी मासळी खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.
उन्हाळ्यात बहुतांश घरात पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे, लोणची व मसाले या विविध पदार्थांसह वाळवणाचे पदार्थ सामुहिक व वैयक्तिकपणे तयार केले जातात. जिल्ह्यात आजही अनेक घरांमध्ये वाळवण संस्कृती जोपासली जात आहे. पापड, कुरडया, चिकोड्या, मिरगुंड, फणस व आंबा पोळी, मसाले, सांडगी मिरची विविध सरबत आदि पदार्थ तयार करण्यासाठी तर गावागावतील महिला गोळा होतात. प्रत्येक महिला आपल्या शेजारणीकडे हे सर्व पदार्थ बनविण्यासाठी विनाशुल्क आनंदाने जाते. मग हे पदार्थ बनवितांना कधी गप्पा रंगतात, तर कधी गाणी गुणगुणली जातात. ज्या घरात हे पदार्थ बनविले जात असतात तिथे महिलांसाठी चहा-नाष्टा आदी दिले जाते. घरातील बच्चे कंपनी देखील त्यांच्या मदतीला सज्ज असतात. तयार पापड, कुरडया, मिरगुंड, फणस व आंबा पोळी, सांडगी मिरची, लोणची, मसाले असे पदार्थ आप्तस्वकियांसह शेजार्यांना देखिल हौसिने चवीसाठी दिले जातात. ही परंपरा व संस्कृती अजुनही टिकून आहे. याबरोबरच अनेक घरांच्या अंगणात, पडवीत, छतावर, कौलावर किंवा पत्र्यावर कापलेल्या आंब्याच्या फोडी आंबोशी करण्यासाठी ठेवल्या जातात. त्याचबरोबर सुकी मच्छी तसेच कोकम सरबत बनविण्यासाठी बाटल्यांमध्ये कोकम ठेवले जाते. मसाल्यासाठी मिरची येथेच सुकविल्या जातात. पापड, सांडगी, कुरडया, चिकोड्या आदि येथेचे बनविले व वाळविले जातात. अशी हि पावसाळ्याची बेगमी व वाळवण संस्कृती अखंडीतपणे सुरु आहे.

आगोटीची लगबग
पावसाळ्याच्या चार महिन्यात भाजीपाला व मासळी यांची आवक कमी होते आणि त्यांचे भाव देखिल वधारतात अशा वेळी घरात साठवुन ठेवलेले कडधान्य व सुकी मच्छी म्हणजे सर्वात चांगला पर्याय असतो. मासळीची आवक कमी, डिझेलचे व मजुरीचे वाढलेल्या दरांमुळे यावर्षी सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. तर कडधान्याचे भाव देखील वाढले आहेत. गोड व कडवे वाल यांना अधिक मागणी आहे. पावासाळ्यासाठी खेड्या-पाड्यातील अनेक जण या जिन्नसांची खरेदी करत आहेत. महत्वाच्या आठवडा बाजारात खरेदीसाठी लोकांची रेलचेल सुरु आहे.







