| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन पोलीस ठाण्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून एका खासगी व्यक्तीचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सदर व्यक्ती ही तरुण असून, सर्व प्रकारची वाहने व जेसीबी चालवण्यात पटाईत आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात जितक्या पोलिसांची नेमणूक आहे तेवढे पोलिस उपलब्ध नसतात. तसेच अनेक जण सुट्ट्या, रजा या वरती गेलेले असतात. त्यामुळे अशा तरुणांची कदाचित पोलिसांना गरज पडत असावी, अशी चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.
अनेक वेळा श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ही व्यक्ती त्या ठिकाणी कायम कोणत्या ना कोणत्या अधिकारी किंवा कर्मचार्याजवळ बोलताना किंवा काही काम करताना दिसून येते. एकदा तर खुर्चीवर बसून काही कागदपत्रे हाताळतानादेखील त्याला पाहण्यात आले आहे. पोलिसांचा कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणत्याही प्रकारची बंदोबस्ताची तयारी असो, हा तरुण त्यामध्ये अवश्य दिसतो. मात्र श्रीवर्धन पोलिसांच्या काही गुप्त गोष्टी किंवा गुप्त माहिती या तरुणाकडून बाहेर पसरविली जाऊ शकते. अशा प्रकारे एका बाहेरच्या तरुणाला श्रीवर्धन पोलीस ठाण्यांमध्ये सतत प्रवेश देणे व त्याच्याकडून कामे करून घेणे अतिशय चुकीचे आहे. तरी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सदर तरुणाला श्रीवर्धन पोलीस ठाण्यात येण्यासाठी बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.