पडद्यामागील कलाकार आर्थिक संकटात

शिवाजी मंदिर रंगकर्मींना अन्नधान्याचे वाटप
अभिनेत्री नयन पवार यांच्या पुढाकार
। खोपोली । प्रतिनिधी ।
कोरोना महामारीची साखळी रोखण्यासाठी राज्यात ताळेबंदी जाहीर केल्यापासून नाट्य, चित्रपटगृह बंद आहेत. राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. पडद्या मागील कलाकार, डोअरकिपर हे संपूर्ण नाट्य व्यवसायावर अवलंबून आहेत मात्र नाट्यप्रयोगच होत नसल्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह कसे करायचे या विवंचनेत असलेल्या कलाकारांना अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा अभिनेत्री नयन पवार यांच्या पुढाकाराने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

शिवाजी मंदिर नाट्यगृहातील पडद्यामागील कलाकार, डोअरकीपर यांना अन्नधान्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा अभिनेत्री नयन पवार,सचिव मानसी राऊत, समाजसेवक रत्नाकर खानविलकर, दिलीप दळवी उपस्थित होते.

पडद्यामागील कलाकारांना नाटकाचा प्रयोग असला तरच त्यांना पैसे मिळतात मात्र टाळेबंदी काळात नाट्य, चित्रपटगृह बंद आहेत.त्यामुळे संपूर्ण नाट्य व्यवसायावर अवलंबून असलेले नाट्यकर्मींना आपले कुटुंब कसे जगवायचे या समस्येत सापडले आहे. नाट्यनिर्माता, संस्था, कलावंत काही दानशूर व्यक्तींंनी त्यांना मदतीचा हात दिला. मात्र काही महिने वगळता लॉकडाऊन सातत्याने चालू आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून लॉकडाऊन असल्याने नाट्य, चित्रपटगृहे बंद आहेत. राज्य सरकारकडून वेळेवर मदत मिळत नाही. त्यामुळे राज्यातील अनेक बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी अरविंदो मीरा संस्थेच्या माध्यमातून छोटीशी मदत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याची माहिती अध्यक्षा अभिनेत्री नयन पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Exit mobile version