लवकरच तिसरी घंटा होणार
| चिरनेर | प्रतिनिधी |
समृद्ध रंगभूमीची परंपरा लाभलेल्या उरण तालुक्यात नाट्य सादरीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. लवकरच तिसरी घंटा होऊन नाटकाचा पडदा उघडणार आहे. तालुक्यातील अष्टगंध कला मंचाच्या वतीने ‘आगरी पेठा’ आणि ‘पैशाने तुटली नाती’ या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा अष्टगंध कलामंचाचे सहसचिव रमेश कोळी यांच्या जन्मदिनानिमित्ताने भेंडखळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आली. ‘आगरी पेठा’ ही नाट्यकलाकृती नाटककार रंजन कान्हा ठाकूर, तर ‘पैशाने तुटली नाती’ ही कलाकृती हसुराम पाटील यांच्या लेखणीतून उतरली आहे. दरम्यान या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नाटककार धनेश्वर म्हात्रे यांच्यावर सोपाविली असून, त्यांनी या नाट्य कलाकृतीचे दिग्दर्शन करण्याला होकार दिला आहे. आगरी रूढी परंपरांवर ही दोन्ही नाटके आधारित असून, आगरी बोलीभाषेचा गोडवा आणि तेवढाच तिखटपणा या आकृतीबंध नाटकातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
या नाटकात अशोक म्हात्रे, कृष्णकांत म्हात्रे, चेतन पाटील, नवनीत माळी, जयकिसन मोकल, दिगंबर कोळी, रमेश कोळी, प्रसाद कडू, रोशन घरत, परीशा सरोदे, वैशाली मोहिते, रुचिता म्हात्रे निकिता पाटील आदी कलाकार भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या भूमिकांमधून त्यांच्या अभिनयाच्या छटा पहावयास मिळणार आहेत.







