| मुंबई | प्रतिनिधी |
शहापूर येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा 2025-26 मध्ये मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचलित श्री गणेश आखाड्याच्या पैलवानांनी शानदार कामगिरी करत स्पर्धेवर आपली छाप उमटवली. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने आयोजित या स्पर्धेत विशाल जाधव, कोमल पटेल आणि मनीषा शेलार यांनी सुवर्ण तर सूरज माने आणि सुदिक्षा जैस्वार यांनी कांस्य पदकाची कमाई केली.
97 किलो वजनी गटात विशाल जाधवने जे. आर. साळवी कॉलेजच्या विपुल परबवर 9-0 गुणांनी विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. 50 किलो वजनी गटात कोमल पटेलने बी. के. बिर्ला कॉलेजच्या भूमी भोईरला चितपट करत सुवर्णपदक पटकावले, तर 53 किलो वजनी गटात मनीषा शेलारने रिझवी कॉलेजच्या सबा शाहचा पराभव करून सुवर्ण विजय मिळवला. सूरज मानेने 86 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. हे चौघेही भाईंदर येथील अभिनव कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्रतिनिधित्व करत आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. त्याचबरोबर सांताक्रुझ येथील सेंट अँड्रूज कॉलेजची सुदिक्षा जैस्वार हिने 62 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. अभिनव कॉलेजच्या मुला-मुलींच्या संघांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांना एकूण तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी प्राप्त झाली. या विजयी कामगिरीमागे महाविद्यालयाचे पी. टी. शिक्षक सचिन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, सुवर्णपदक विजेत्यांची अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.






