बेलापूर-कर्जत बस सेवा सुरु

कर्जतच्या प्रवाशांसाठी नवी मुंबई महापालिकेची मदत
। नेरळ । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कामगार यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे, त्यामुळे एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्जत तालुक्यातील नोकरवर्ग मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास करून नवी मुंबईत जात होता. एसटी बंद असल्याने त्या प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने बेलापूर-कर्जत अशी बस सेवा सुरु केली आहे.
एसटीचा संप आणि कामगारांचे कामबंद आंदोलन यामुळे सर्वत्र एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कर्जत-पनवेल एसटी प्रवासासाठी 45 रुपये तिकीट असून खासगी गाड्या या एका प्रवाशासाठी 70-80 रुपये आकारात आहे. त्यामुळे दुपटीने पैसे देऊन प्रवासी कंटाळले आहेत. त्या सर्व नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी यांना नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने दिलासा दिला आहे. नवी मुबई पालिकेच्या परिवहन विभागाने दि.17 नोव्हेंबर यापासून आपली परिवहन सेवा कर्जत पर्यंत देण्याचा निर्णय घेतला आणि परिवहन सेवा सुरु केली आहे.
बेलापूर रेल्वे स्टेशन पासून कर्जत रेल्वे स्टेशन या दरम्यान सकाळी साडे सहा पासून सुरु होणारी परिवहन सेवा रात्री नऊ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. या काळात बेलापूर येथून कर्जत करिता 14 तर कर्जत येथून बेलापूरसाठी 16 फेर्‍या असणार आहेत अशी माहिती नवीमुंबई परिवहन सेवेने दिली असून आसुडगाव येथील आगारातून 49 क्रमांकाची बस कर्जत साठी सुरु करण्यात आली आहे.

Exit mobile version