आंदोलनाचा सहावा दिवस
कर्जत एसटी आगारातील घटना
। नेरळ । वार्ताहर ।
राज्यपरिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीवरून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, या आंदोलनात विविध प्रकार पहायला मिळत आहेत. या आंदोलनातील सहाव्या दिवशी कर्जत एसटी आगारात कर्मचार्यांच्या आंदोलनात त्यांचे कुटुंबदेखील सहभागी झाल्याची घटना घडली आहे.
कर्जत तालुका एसटी आगार गेल्या काही दिवासांपासून प्रवासी वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, आपल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी कामगार आंदोलनावर ठाम आहेत.
सरकारकडून मागण्या मान्य होत नसल्याने कामगारांनी आंदोलन आणखी तीव्र केले आहे. 13 नोव्हेंबर रोजी कर्जत एसटी आगारात कामबंद आंदोलन करणार्या 93 कामगार यांच्या पाठीशी त्या कामगारांचे कुटुंबीय समर्थन देण्यासाठी उतरले आहेत.
कर्जतमध्ये निवासी असलेल्या कामगारांचे कुटुंबीय हे आंदोलनात सहभागी झाले आहेत. यात महिला आणि विद्यार्थी यांचा समावेश असून सर्व कामगारांचे कुटुंबीय आंदोलन असेच सुरू राहिल्यास, धडक आंदोलन करणार आहेत. याशिवाय, आंदोलनाला कर्जत तालुक्यातील राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.