56 प्राथमिक आरोग्य केंद्रात वातानुकूलित कक्ष उभारणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवू लागली आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासह उष्माघात प्रतिबंधासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय ही आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 56 आरोग्य केंद्रात वातानुकूलित कक्ष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित येणाऱ्या 16 आरोग्य संस्थामध्ये उष्माघात कक्ष उभारले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यंदा पाऊस लवकरच गायब झाला. तसेच, सध्या एल निनोच्या प्रभावामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडणेही कठीण झाले आहे. बदलत्या वातावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे वेगवेगळे आजार उद्भवू लागले आहेत. तसेच, उन्हामुळे डोकेदुखीचा त्रास अनेकांना जाणवत असून, दवाखान्याच्या फेऱ्याही वाढल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात दिवसा कमाल 36 ते किमान 30 अंशांपर्यंत तापमान जाणवत आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये उष्माघाताचा धोका संभवतो. उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित खोली निर्माण करण्याचे निर्देश राजिप उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांनी दिले आहेत. उष्माघात हा गंभीर स्वरूपाचा धोका असल्यामुळे काही वेळा रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच उष्णतेमुळे बाधित झालेल्या रुग्णांना वेळेत शक्यता उपचार मिळणे आणि त्यांना योग्य वातावरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. या पाश्वभूमीवर जिल्ह्यातील 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित खोलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच आवश्यक आरोग्यसेवा मिळावी, तसेच उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, हा प्रमुख उद्देश आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करावे. सर्व 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित खोली निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. उष्णतेच्या पाश्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक वातानुकूलित कक्ष निर्माण करण्याचा ठराव राजिपचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे उष्माघातामुळे प्रभावित नागरिकांना सेवा पुरविणे सोयीचे ठरणार आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित येणारे 6 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालय अशा एकूण 16 दवाखान्यांमध्ये उष्माघात कक्ष उभारण्याच्या सुचना दवाखान्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
उष्माघातापासून बचावाचे उपाय
नियमित पाणी प्या.
दुपारी 12 ते 3 या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळा.
बाहेर जाताना टोपी, छत्री आणि सैल कपडे वापरा.
ताक, लिंबूपाणी अशा पेयांचे सेवन करा.
प्रथमोपचारावर दृष्टीक्षेप
व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी न्या.
अनावश्यक घट्ट कपडे सैल करा.
शरीरावर थंड पाणी शिंपडा.
ओल्या कपडाने शरीर पुसा.
त्वरीत आपत्कालीन रुग्णवाहिकेला संपर्क करा.
सध्या तापमानात वाढ झाली आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत विनाकारण घराबाहेर पडू नये. साधारणपणे घराबाहेर पडणे टाळावे. ताक व फळांचा आहार घ्यावा. काही त्रास जाणवल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार करावे.
डॉ. शितल जोशी,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय अलिबाग







