बैठकीतून तोडगा काढण्याचे परिवहन मंत्र्याचे आश्वासन
। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. दिवाळीपुर्वी मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करणार, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे. याबाबत परिवह मंत्री प्रताप सरनाईक यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले असून, बैठक घेऊन आंदोलनावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन सरनाईक यांनी दिल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
एसटी बस ही सर्वसामान्यांची जीवनवाहीनी म्हणून ओळखली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून सर्व घटकातील आधार म्हणून एसटीकडे पाहिले जाते.प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते मिळावे, थकीत वार्षिक वेतनवाढ, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, तातडीने अदा करण्यात यावा. दिवाळी भेट 25 हजार रुपये देण्यात यावी. ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपुर्वी मिळावे. शिलाई भत्ता, धुलाई भत्ता, स्थानिक पुरक भत्ता देण्यात यावा. कर्मचाऱ्यांवरील अनावश्यक दबाव व अन्यायकारक कारवाई तात्काळ थांबविण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन असणार असल्याचे कामगार संघटनेकडून सांगण्यात आले आहे. याबाबत परिवहन मंत्री यांची संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यामुळे परिवहन मंत्री कामगारांच्या प्रश्नाबाबत काय भुमिका घेणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, माणगाव, महाड, श्रीवर्धन व मुरूड असे आगार असून, 19हून अधिक एसटी स्थानक आहेत. जिल्ह्यात अडीच हजार कर्मचारी असून, त्यात दीड हजार चालक व वाहक आहेत. जिल्ह्यातून महिन्याला साधारणपणे 35 कोटी रुपयांचे उत्पन्न एसटीतून उपलब्ध होते. ऐन सणासुदीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास एसटी सेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.







