52 हजार अर्ज निवडणूक विभागात प्रलंबित
। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळावा, यासाठी रायगड जिल्ह्यातील 52 हजार 412 जणांनी निवडणूक विभागात अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील निवडणूक विभागात हे अर्ज प्रलंबित असून, 26 हजार नव मतदारांना प्रतिक्षा लागून राहिली आहे. एसआयआर प्रक्रीया सुरु असल्याने ही कामे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 25 लाख 33 हजार 739 मतदार आहेत. त्यामध्ये अलिबाग विधानसभा मतदार संघात तीन लाख 5 हजार 255, श्रीवर्धनमध्ये 3 लाख 62 हजार 680, महाडमध्ये 2 लाख 95 हजार 449, पनवेलमध्ये 6 लाख 84 हजार 95, कर्जतमध्ये 3 लाख 19 हजार 337, उरणमध्ये 3 लाख 57 हजार 255, पेणमध्ये 3 लाख 5 हजार 255 मतदारांचा समावेश आहे.
मतदार वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा तालुका स्तरावर शिबीर घेऊन मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. निवडणूक विभागाच्या या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाली. त्यानंतर त्यातील काहींनी नाव व पत्ता दुरुस्तीसह नाव कमी करणे, अनिवासी भारतीय तसेच नव्याने मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रीया राबविली. यावेळी जिल्ह्यातील 52 हजार 412 नागरिकांनी निवडणूक विभागाकडे अर्ज भरला होता. त्यामध्ये नवीन नोंदणीसाठी (सहा नं. फॉर्म) 26 हजार 542, अनिवासी भारतीय असलेल्या 242 नागरिकांनी (सहा अ फॉर्म) 242, नाव कमी करण्यासाठी (सात नं. फॉर्म) 3 हजार 523, नावात आणि पत्त्यामध्ये बदल म्हणजे दुरुस्तीसाठी(आठ नं. फॉर्म) 22 हजार 105 अर्जांचा समावेश आहे. आपले मतदार यादीत नाव असावे आणि मतदान कार्डसह यादीमध्ये झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र, सध्या निवडणूक विभागामार्फत एसआयआर ही प्रक्रीया सुरु असल्यामुळे 52 हजार अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 26 हजार नवं मतदारांना मतदान ओळखपत्रासह नोंदणीची प्रतिक्षा लागून राहिली असून, नावात आणि पत्त्यामधील दुरुस्तीची 22 हजार अर्ज प्रलंबित आहे. एसआयआरमुळे ही कामे रखडली असल्याने मतदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विविध अर्जावर दृष्टीक्षेप
नवीन अर्ज - 26542
नाव कमी - 3523
नाव आणि पत्ता दुरुस्ती - 22105
अनिवासी भारतीय - 242
नवीन अर्जासह नाव कमीचे अनेक अर्ज कार्यालयात प्राप्त झाले आहेत. सध्या एसआयआर प्रक्रीया आहे. त्यामुळे हे अर्ज प्रलंबित आहेत. लवकरच ही प्रक्रीया पुर्ण केली जाईल.
नितीन वाघमारे,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड







