बेलदार समाज मंत्रालयावर धडकणार

रायगडातील हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी ऐन हिवाळी अधिवेशनात सकल बेलदार समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आरपारची लढाई सुरू केली आहे. प्रचंड एकजूट आणि ताकतीने एकत्र येत दि.9 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण बेलदार समाज आपल्या कुटुंबासह पुणे ते मुंबई मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाला आहे. रायगडातील हजारो कार्यकर्त्यांचा पदयात्रेत सहभाग घेतला आहे. आता जीव गेला तरी बेहत्तर, बेलदार समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका सकल बेलदार समाजाने घेतली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री सर्व आंदोलक समाज घटकांना भेटून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या सकारात्मक भूमिकेतून आश्वासन देतात, मात्र बेलदार समाजाकडे सरकार कायम दुर्लक्ष करीत आले आहे. बेलदार आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटावे आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी आग्रही मागणी बेलदार समाजाने केली आहे. महाराष्ट्रातील किल्ले, घर, वाडे यांसाठी घडीव दगड, तोडी बनवणारा बेलदार समाज आजही अत्यंत, कष्टप्रद, संघर्षमय आणि भटकंतीचे जीवन जगतोय. बेलदार समाजातील अनेक कुटुंबं आजही गावाकुसाबाहेर शेतात झोपड्यांमध्ये वास्तव्य करीत आहेत. या उपेक्षित समाजाला शासनाकडून मूलभूत, पायाभूत, नागरी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी बेलदार समाज आक्रमक झाला आहे. इतर राज्यांमध्ये बेलदार समाजाला ज्या सुविधा मिळतात, त्या महाराष्ट्रात मिळाव्यात, जातीच्या दाखल्याकरिता 61 च्या रहिवास पुराव्याची अट रद्द करावी, हक्काची घर आणि पारंपरिक व्यवसाय म्हणून दगड खाणींची रॉयल्टी माफ व्हावी, अशा महत्त्वपूर्ण मागण्या बेलदार समाजाकडून केल्या जात आहेत. आमचा लढा आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील, असा इशारा बेलदार समाज नेते रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

Exit mobile version