बेली आदिवासीवाडी अंधारात; स्वातंत्र्यापासून प्रकाश पाहिलाच नाही

मुलांचे शैक्षणिक नुकसान

| आगरदांडा | प्रतिनिधी |

एकीकडे भारत देश स्वतंत्र दिनाचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करीत असला तरी अद्यापही राज्यातील आदिवासी बांधव मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. याठिकाणी पाणी, रस्ते, वीज आदी सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाहीत. असे विदारक चित्र मुरुड उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलीवाडी आदिवासी वाडीवर दिसून येत आहे.

उसरोली ग्रामपंचायतीपासून दोन किलोमिटर अंतरावर डोंगराल भागातील बेली आदिवासी समाज आपल्या परिवारासह अनेक वर्षे वास्तव्य करीत आहे. परंतु, विजेच्या प्रकाशासाठी सध्या झगडावे लागत आहे. वीज नसल्याने मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या भवितव्य अंधारात आहे. 11 घरांना अजूनपर्यंत वीज उपलब्ध नसल्याने येथील आदिवासी बांधवांना चाचपडत राहावे लागत आहे. विजेअभावी येथील आदिवासीवाडीचा विकास खुंटला आहे. याठिकाणचे आदिवासी समाज रोजच्या रोज आपल्या उदारनिर्वासाठी मजगाव, नांदगाव, उसरोली याठिकाणी जात असतात. परंतु कामावर येत असताना विजेचा समस्यांमुळे अनेक संकटना तोंड द्यावे लागत आहे. तरी या गंभीर समस्येकडे शासनाने लक्ष देऊन आदिवासी वाडी प्रकाशमय करावी, अशी मागणी आदिवासी बांधव करीत आहेत.
देश स्वातंत्र्यानंतर आज 75 वर्षे झाली तरी या 11 घरांना वीज नाही. निवडणुकांच्या काळात राजकीय मंडळी याठिकाणी येतात व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देतात. मात्र, निवडणूक झाली की गावाकडे पाठ फिरवत असल्याचे येथील आदिवासी महिला सांगत आहेत. आमच्या भावना आपल्या माध्यमातून सरकाराला कळावा, असे आवाहन यावेळी स्थानिक आदिवासी बांधव व महिलांनी केले.

ग्रामपंचायतीमधून विजेच्या खर्चाकरिता निधी येत नाही, तो खर्च प्रत्येकाचा असतो. तरी पण आम्ही दानशूर व्यक्तींकडे शब्द टाकून याठिकाणी विजेचा पोल बसविण्याचा प्रयत्न करु.

मनिष नांदगावकर, सरपंच, उसरोली
Exit mobile version