। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेली आदिवासी वाडी अंगणवाडी करिता जिल्हा नियोजन समितीमधून 11 लाख 25 हजार रकमेची नवीन अंगणवाडी मंजूर करण्यात आली आहे.
मुरुड उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलीवाडी आदिवासी वाडीवर अंगणवाडी अस्तित्वात नसल्याने या ठिकाणी अंगणवाडी सेविका गेले 2010 पासून जिल्हा परिषद शाळेच्या किचनमध्ये 0 ते 6 वयोगटातील 27 बालकांना शिक्षणाचे धडे देत होती. शिक्षण देत असताना बालकांनसाठी बैठकीची सुसज्ज व्यवस्था नव्हती. रुमची अवस्था कोंडवाड्याप्रमाणे होती. शिक्षण घेत असताना बालकांना खुप अडचणीला सामोरे जावे लागत होते. ही व्यथा आदिवासी समाज बांधवांनी व ग्रीन वर्कस् ट्रस्ट गार्गी गीध व आमच्या प्रतिनिधीकडे मांडल्यानंतर त्या संदर्भातील बातमी लागताच तिची दखल माजी आ. पंडित पाटील, उसरोली सरपंच मनिष नांदगावकर व शेकाप तालुका चिटणीस अजित कासार, जिल्हा सहचिटणीस मनोज भगत यांनी दखल घेऊन जिल्हा नियोजन समिती निधीतून 11 लाख रुपये 25 हजार रकमेची नवीन अंगणवाडी मंजूर करण्याकरिता प्रयत्न केले.