| अलिबाग | प्रतिनिधी ।
बेलोशी बिग बुल्स आणि वरसोली चॅलेंजर्स या संघामध्ये अंतिम लढत झाली. त्यामध्ये बेलोशी संघाने घवघवीत यश मिळवत पीएनपी चषक 2025 चा मानकरी ठरला.
पीएनपी चषक 2025 टेनिस क्रिकेट स्पर्धेत अंतिम तीनमध्ये बेलोशी बिग बुल्स, वरसोली चॅलेंजर्स आणि नांदगांव निजास या संघांची निवड झाली. सुरुवातीला पहिला उपांत्य सामना बेलोशी बिग बुल्स आणि नांदगाव निंजास या संघांमध्ये झाला. त्यामध्ये बेलोशी संघाने जोरदार फटकेबाजी करत 6 षटकामध्ये 93 धावा केल्या. 36 चेंडूमध्ये 94 धावांचे लक्ष्य नांदगाव संघासमोर होते. मात्र, बेलोशी संघाने नांदगाव संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचू न देता 5.5 षटकामध्ये सर्व खेळाडू बाद करून 60 धावांमध्ये हा खेळ संपवला. त्यामुळे बेलोशी बिग बुल्स हा संघ अंतिम फेरीत पोहचला. त्यानंतर वरसोली चॅलेंजर्स आणि नांदगांव निंजास या संघामध्ये दुसरा उपांत्य सामना झाला. नांदगांव संघाने 5 षटकांमध्ये 48 धावा केल्या. वरसोली संघाला विजयासाठी 49 धावांची आवश्यकता होती. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू शर्तीचे प्रयत्न करत होते. 4 षटकापर्यंत वरसोली संघांच्या 34 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 12 चेंडूत 15 धावांची गरज होती. शिरूवीकने पाचव्या षटकात चौकारांचा मारा आणि संघाला विजय मिळवून दिला. 52 धावा करून संघ विजची झाला. या स्पर्धेत कर्णधार शिरू बाजीगर ठरला असून त्याला सामनावीरचा किताब देण्यात आला.
अंतिम सामन्याची लढत वरसोली चॅलेंजर्स आणि बेलोशी बिग बुल्स या संघामध्ये झाली. बेलोशी संघाने सुरुवातीला फलंदाजी स्विकारली. त्यांनी 6 षटकात 56 धावा केल्या. वरसोली संघासमोर विजयासाठी 57 धावांची गरज होती. परंतू, 43 धावांत हा खेळ बेलोशी संघाने आटोपून 14 धावा राखून विजय मिळवला आणि पीएनपी चषकावर आपले नाव कोरले.