तीन महिने उलटूनही कुटुंबियांच्या नातेवाईकांचे व्हेरिफिकेश सुरुच
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तीन महिने उलटूनही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना जेएसडब्ल्सू कंपनी तसेच ठेकेदार जे.पी.म्हात्रे यांनी एकही रुपया दिला नाही. कुटूंबियांना निधी देण्याचा कंपनी व ठेकेदाराला विसर पडल्यामुळे पोलिसांनी आता त्यांना स्मरणपत्र दिले असल्याचे वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले.
पेण तालुक्यातील वडखळ येथे जेएसडब्ल्यू कंपनीत 24 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात घडला. बी.एफ प्लांट 2 ब्लास्ट फरनिस 2 येथे गरम पाण्याच्या टाकीतील पाणी ओव्हरफ्लो होऊन अचानक बाहेर आहे. ते पाणी त्या ठिकाणी काम करणार्या 7 कमागारांच्या अंगावर पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने पेण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापैकी 4 कामगारांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच अन्य दोघांना पुढील उपचाराकरीता ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठेकेदार व कंपनीने मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजमितीस त्यांना एकही रुपया मिळालेला नाही.
याप्रकरणी माहिती घेत असताना कृषीवलने मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना संपर्क साधला. त्यावेळी त्यांना एकही रुपया मिळाला नसल्याची बाब समोर येताच कृषीवलने वडखळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीही ठेकेदार तसेच कंपनीकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळी अद्यापही मृत व्यक्तींच्या नातेवाईकांचे व्हेरिफिकेशन झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना तात्काळ मदत मिळावी, याकरीता पोलिसांनी कंपनी तसेच ठेकेदाराला याबाबतचे स्मरणपत्र दिल्याचे सांगण्यात आले.
कंपनीसह ठेकेदारवर गुन्हा दाखल करा
या अपघातात चंदनकुमार ननहक महता, जितेंद्र योगेंद्र राय, ईरशाद वकील अन्सारी व योगेंद्रकुमार संभू महतो या चौघांचा मृत्यू झाला. यापैकी योगेंद्रकुमार महतो याचा 26 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात मृत्यू झाला. हे सारे कामगार जेएसडब्ल्यू कंपनीने नेमून दिलेल्या जे.पी.म्हात्रे यांच्या शिवदत्ता एन्टरप्रायझेस या ठेकेदारामार्फत कंपनीत काम करीत होते. त्यामुळे कंपनीसह ठेकेदारावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
अहवालाची प्रतीक्षा
हा अपघात कसा घडला, नेमकं कारण काय, याबाबतचा अहवाल कंपनीकडे पोलिसांनी मागितला होता. त्याप्रमाणे प्राथमिक अहवाल संबंधित अधिकार्यांनी दिला असून अंतिम अहवाल देण्यास दिरंगाई होत असल्याने पोलिसांना कारवाई करणे कठिण जात असल्याचे समोर आले आहे.
कंपनी तसेच ठेकेदाराला याबाबतचे स्मरणपत्र दिले आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. मात्र कायद्याने त्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल. पोलीस कंपनी तसेच ठेकेदाराला पाठीशी घालणार नाहीत. मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल.
प्रसाद पांढरे,
पोलीस निरीक्षक, वडखळ
ठेकेदारावर राजकिय वरदहस्त?
जेएसडब्ल्यू कंपनीला कामगार पुरविणारी शिवदत्ता एन्टरप्रायझेस या कंपनीचे मालक जे.पी.म्हात्रे यांच्यावर मोठ्या राजकिय नेत्याचा वरदहस्त असल्यामुळे तो नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.