गावाचा जल समृद्ध गाव म्हणून उल्लेख; पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध
| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर पंचायत समितीच्या मुकुटात आणखी एका पुरस्काराची नोंद झाली आहे. शासनाच्या नाविन्य पूर्ण अभियानाचे रूपांतर गावच्या सर्वांगीण विकासात करण्यासाठी खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड हे रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून विस्तार अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, सरपंच, सदस्य अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. खालापूर पंचायत समिती शासनाच्या नाविन्य पूर्ण अभियानात राज्यात प्रथम स्थानावर असून, आता दिल्ली कडे गरुड झेप घेऊन जल समृद्ध गाव म्हणून खरीवली यांनी दिल्लीत पुरस्कार प्राप्त केला.
जलसमृद्ध या योजनेतून ग्राम पंचायत खरिवली यांनी काम करून देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आज गाव जल समृद्ध गाव म्हणून ओळखले जात आहे. ग्रामसभा आणि शासकीय यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सात नवीन जल स्तोत्र, चौदा पाणी स्तोत्राचे पुनर्जीवन केले. राज्य सरकारने राज्य सरोवर निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी जल समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. जलजीवन मिशन, पंधरावा वित्त आयोग यातून पाणी स्रोत निर्माण करण्यावर भर दिला. जिल्हा नियोजन यातूनही कामांना सुरुवात केली. विशेष म्हणजे सर्व पाणी पुरवठा योजना सोलर पॅनलवर करण्यात आली आहे. शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत सर्व ठिकाणी सोलर पॅनल सुरू करण्यात आले आहे.
जल समृद्ध गाव म्हणून काम करण्याची संधी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे, गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन, योग्य सहकार्य मिळाल्याने हे यश प्राप्त झाले, असे ग्राम पंचायत अधिकारी मनाली म्हसे यांनी सांगितले. कार्यक्रमास पंचायत राज सचिव विवेक भारद्वाज, अप्पर सचिव सुशील कुमार सोहनी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल हे उपस्थित होते.
पाणी टंचाईवर मात
पाणी टंचाईवर मात करून शाश्वत पाणी व्यवस्थापन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. खरिवली ग्राम पंचायत यांनी जलसंधारण, विहिरींचे पुनर्भरण, शेततळे, नळजोडणी आणि पाण्याचा योग्य वापर यांद्वारे शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध केले आहे, ज्यामुळे गावाचा जल समृद्ध गाव म्हणून उल्लेख झाला







