। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल परिसरात तीन अत्यंत गंभीर स्वरूपाच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पनवेल शहर, खारघर आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत या घटनांची नोंद झाली असून, यामध्ये मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, एका विकलांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा प्रकार आणि सात वर्षांच्या बालिकेशी अश्लील कृत्य केल्याच्या घटनेचा समावेश आहे.
पनवेलमधील लाईन आळी परिसरातील एका खासगी दवाखान्याच्या शौचालयात सुमारे पाच ते सहा महिन्यांचे मृत अर्भक फिनेलयुक्त पाण्याच्या बादलीत आढळून आले. एका 22 वर्षीय महिलेने गर्भपात लपविण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या फरार महिलेचा शोध घेत आहे. दुसऱ्या घटनेत, खारघर परिसरात एका शारीरिकदृष्ट्या विकलांग आणि अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. या संवेदनशील प्रकरणात खारघर पोलिसांनी तात्परतेने कारवाई करत एका संशयित नराधमाला अटक केली आहे. तिसऱ्या घटनेत, आकुर्ली येथील एका निवासी संकुलात सात वर्षांच्या चिमुरडीला लपाछपी खेळण्याचे आमिष दाखवून जिन्याखाली नेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करण्यात आले. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील 40 वर्षीय आरोपीला त्याच्या कामाच्या ठिकाणावरून अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या लागोपाठ घडलेल्या गंभीर घटनांमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.






