लाभार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

22 जानेवारीला सहाण येथे कार्यक्रम
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या जन शिक्षण संस्थेमधून व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या लाभार्थ्यांचा सन्मान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. 22 जानेवारी रोजी सहाण येथील श्री मंगल कार्यालयात नियोजनबद्ध कार्यकम आखण्यात आल्याची माहिती जनशिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मेधा सोमैय्या यांनी दिली. जन शिक्षण संस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जनशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेधा सोमैय्या बोलत होत्या. यावेळी चेअरमन डॉ. नितीन गांधी, संचालक विजय कोकणे, अ‍ॅड. नीला तुळपुळे, संजय राऊत, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, दक्षता समिती सदस्य नरेन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अलिबाग तालुक्यातील श्रीगणेश मंगल कार्यालाय सहाण येथे यशस्वीतांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि किरीट सोमैय्या यांच्या हस्ते होणार आहे. सहाण येथे दुपारी दोन वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 260 यशस्वीतांचा सत्कार करण्यात येणार आहे. या महिलांचे गट तयार करून त्यांना सामूहिक स्वरूपात गौरविण्यात येणार आहे, असे मेधा सोमैय्या यांनी सांगितले. जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात 160 साधन व्यक्ती आहेत. त्यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्यात आले आहे, असे मेधा सोमैय्या यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि सर्वसामान्य जनतेला प्राथमिक उपचार तातडीने मिळावे यासाठी गावातील शिक्षित असणार्‍या महिलांना नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक गावात उपचार करणारी व्यक्ती उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. संपूर्ण जिल्ह्यातील 15 खासगी रुग्णालये आणि तेथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांची मदत घेऊन संस्था महिलांना नर्सिंगचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे जन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी सांगितले.

Exit mobile version