। हैद्राबाद । वृत्तसंस्था ।
प्रो कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटण यांच्यात मंगळवारी (दि.29) हैदराबाद येथील गचीबोवली येथील इनडोर स्टेडियममध्ये खेळला गेलेला सामना 32-32 असा बरोबरीत सुटला.
एकेकाळी पुणेरी पलटण संघ खूप पुढे होता पण उत्तरार्धात बंगालचा रेडर सुशीलने चमकदार कामगिरी करत संघाला सामन्यात परत आणले. या सामन्यात सुशीलने सुपर-10 पूर्ण केले तर कर्णधार फजल अत्राचलीने 500 टॅकल गूण पूर्ण करत मोठा विक्रम केला. पीकेएलमध्ये 500 टॅकल पॉइंट मिळवणारा तो पहिला बचावपटू ठरला. पुणेरी पलटणकडून आकाश शिंदे आणि पंकज मोहिते यांनी प्रत्येकी 8 गुण घेतले.
या लढतीत दोन्ही संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रात पुणेरी पलटण संघाने 15-12 अशी 3 गुणांची आघाडी घेतली होती. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी 6 गुण चढाईतून तर प्रत्येकी 6 गुण पकडीतून मिळविले. मात्र, पुणेरी पलटणने बंगला वॉरियर्ससंघावर लोण चढविताना 2 जास्तीच्या गुणांची कमाई केली.दुसर्या सत्रात मात्र बंगाल वॉरियर्सने पुणेरी पलटण पेक्षा उजवा खेळ करताना 20 गुणांची कमाई केली. मात्र, पुणेरी पलटण संघाला 17 गुणांची कमाई करता आली. बंगाल वॉरियर्ससंघाने दुसर्या सत्रात चढाईतून 15 गुणांची तर पकडीतून केवळ 3 गुणांची कमाई केली. पुणेरी पलटण संघाने चढाईतून 11 तर पकडीतून 4 गुणांची कमाई केली. दोन्ही संघांनी एकमेकांवर लोण चढविताना प्रत्येकी 2 गुणांची कमाई केली.