| पाली/बेणसे | वार्ताहर |
ऐन पावसाळ्यात बेणसे गावावर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने बेणसे गावाला अनियमित, गढूळ, दूषित व अल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिला व ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. अखेर महिला व ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून पाणी प्रश्नावर त्यांनी गुरुवारी (दि.17) बेणसे ग्रामपंचायतीवर धडक दिली. लवकरात लवकर गावाला मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.
बेणसे गावाला मागील अनेक वर्षांपासून रिलायन्स नागोठणे कंपनीमार्फत शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची देखभाल व दुरुस्ती वेळेत व नियमित होत नसल्याने पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दरम्यान, बेणसे ग्रामपंचायत कार्यालयात पाणी प्रश्नावर जाब विचारण्यासाठी कल्पना अडसुळे, माजी सरपंच स्मिता कुथे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत कुथे, बेणसे स्थानिक भूमीपुत्रांची सामाजिक संस्था रायगडचे अध्यक्ष बबन अडसूळे, विजय एटम, योगेश अडसुळे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बेणसेचे ग्रामसेवक सचिन घरत यांनी उपस्थित ग्रामस्थांना आश्वाशीत केले की, सद्यस्थितीत ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने मला सुद्धा काही कामे करण्याचा पूर्ण अधिकार नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने विस्तार अधिकारी यांच्याशी या पाण्याच्या मुद्द्यावर सविस्तर बोलणी केली जाईल. त्यांनतर रिलायन्स व्यवस्थापनाशी सुद्धा बोलणी व लेखी पत्रव्यवहार करून नादुरुस्त व जुन्या जर्जर झालेल्या पाईपलाईन दुरुस्ती बाबत मागणी करूयात, असे देखील त्यांनी सांगितले.







