पांडुरंग पाटील यांना सर्वोत्कृष्ट कबड्डी पंच पुरस्कार

। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील कारावी गावचे नवतरुण क्रीडा मंडळ कारावी मंडळाचे ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, पंच पांडुरंग पाटील यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ पंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्व शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिवस कबड्डीदिन म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. यावेळी पांडुरंग पाटील यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

दरम्यान, राज्य संघटनेने नियुक्त केलेल्या परीक्षक मंडळाने कबड्डी क्षेत्रातील ज्येष्ठ पंच पुरस्कारासाठी पांडुरंग पाटील यांची निवड केली. त्यांना पुणे बालेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्य असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, बाबुराव चांदोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पांडुरंग पाटील यांनी रायगड जिल्हा कबड्डी संघाचे तीन वर्ष प्रतिनिधीत्व केले आहे, तर राज्य परिवहन महामंडळाच्या कबड्डी संघातून सतत तीन वर्ष त्यांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत संघाचे प्रतिनिधीत्व करुन राज्य परिवहन महामंडळाला द्वितीय क्रमांक मिळवून दिला आहे. तर औरगाबाद येथे झालेल्या राज्य अंजिक्यपद किशोर गट स्पर्धेसाठी ते रायगड संघाचे प्रशिक्षक असताना संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम क्रमांक मिळविला होता.

राष्ट्रीय व राज्य स्तरिय कबड्डी स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धेत निरीक्षक, पंचप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना सर्वोत्कृष्ट कबड्डी पंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version