बेस्ट ऑफ लक… उद्यापासून बारावीची परीक्षा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या (उच्च माध्यमिक) परीक्षेला मंगळवारी (दि.21) पासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेला रायगड 31 हजार 272 विद्यार्थी सामोरे जाणार असून, जिल्हाभरात 46 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केली आहे. तसेच कॉपी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व पोलीस लक्ष ठेवणार आहेत. बारावी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. या भरारी पथकांवर उपविभागीय अधिकारी यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा पातळीवर पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हे परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.

निवडणुकीच्या धर्तीवर परीक्षा
ज्या धर्तीवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते त्या धर्तीवर जिल्ह्यात शाळांत प्रक्रिया राबविण्यात असून, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षा देणारे विद्यार्थी, पर्यावेक्षक, परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी, भरारी पथके यांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या परिसरात झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

इयत्ता बारावी परीक्षेत बसणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून शुभेच्छा. विद्यार्थ्यांनी दडपण न घेता परिक्षेला सामोरे जावे. पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनी प्रश्‍न वाचून समजून घेऊन उत्तर लिहावे. शासनाने तसेच शिक्षण विभागाने वेळोवळी केलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे.

डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version