सावधान! रायगड जिल्ह्यात डोळ्यांची साथ…जाणून घ्या लक्षणे

। पनवेल । दीपक घरत ।
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ पसरली आहे. डोळ्यांशी संबंधित तक्रारी जाणवत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण परिसरातील रुग्णालयात तक्रारी घेऊन येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन परिसरातील डॉक्टर करत आहेत.

डोळ्यातून पाणी आणि कचरा येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसर्‍या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपासून नागरिक विविध संसर्गजन्य आजरांचा सामना करत आहेत. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचा सामना केल्यानंतर बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने चिंतेत असलेले नागरिक सध्या डोळे येण्याच्या साथीने त्रस्त आहेत.

डोळ्यांच्या व्याधीने त्रस्त रुग्णाचा हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून दिवसभरात 100 पैकी 3 ते चार संसर्ग झालेले रुग्ण उपचारासाठी येत असून रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती नवीन पनवेल परिसरातील एक प्रतिष्ठित डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

पनवेल परिसरात महिन्याभरापासून डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते. डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसर्‍या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की, पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही, असं अनेकांना वाटतं म्हणून अनेकजण निष्काळजीपणा करतात. पण असं नाही, एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात.

डोळ्यांना त्रास जाणवत असल्यास डोळे थंड पाण्याने धुवावेत. जेणेकरून डोळे सुके राहणार नाहीत. जास्त त्रास जाणवत असल्यास तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. सचिन नलावडे. स्पर्श रुग्णालय. पनवेल.

Exit mobile version