सावधान, रोहा शहरात विकली जातेय अपायकारक ‘बिर्याणी’

कारवाई करणार कोण ? सामान्यांचा सवाल

रोहा | प्रतिनिधी |


आजकाल अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ स्वच्छ व ताजे मिळतेच असे नाही. उलट निकृष्ट दर्जाची मिठाई, फळे मुख्यतः चायनीज, बिर्याणी सामान्य ग्राहकांच्या माथी मारण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. शहरातील प्रसिद्ध स्वीट मार्ट यांच्या गोडव्याला मुंग्याच येत नाही, असेही धक्कादायकपणे अनेकदा समोर आले. दुसरीकडे बहुतेक हॉटेल्सवाले पदार्थांचा दर्जा घसरवत आहेत, याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाला लक्ष द्यायला वेळ नाही. नगरपरिषद आरोग्य विभाग कायम अनभिज्ञ आहे, हे आरोग्याचे धोकादायक वास्तव असतानाच शहरातील काही बिर्याणी विक्रेते मुख्यतः तीन बत्ती नाकाच्या पुढील प्रसिद्ध बिर्यानी विक्रेता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची जोरदार चर्चा आहे. बिर्याणीसाठी अक्षरशः निष्कृष्ट दर्जाचे चिकन वापरले जाते. स्वच्छतेबाबत काळजी घेतली जात नाही, याबाबत ग्राहकांनी अनेकदा तक्रारी केल्या, काहींनी खराब चिकन वापरत असल्याचे वारंवार पकडले. त्यातूनही संबंधीत बिर्याणी पार्सल विक्रेत्याने बोध न घेतल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग, स्थानिक प्रशासन मुख्यत: रोहा नगरपरिषद आरोग्य विभाग कारवाई करतो का ? असा सवाल सामान्यातून उपस्थित उपस्थित झाला आहे.

कोरोनाने सर्वांनाच स्वच्छ राहायला, स्वच्छ खायला शिकवले आहे. पण बाजारात खाद्यपदार्थ, फळे, बाहेरून येणारी भाजी स्वच्छ व ताजे मिळतेच, याची खात्री नाही. त्यातच केळी यांसह अनेक फळे रासायनिक प्रक्रियेने पिकवली जातात. फळांच्या गोदामात नेमके काय चालते ? याबाबत संबंधीत प्रशासनाने खात्री केल्याचे कधीच समोर नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कधीच तक्रारींतून कारवाई करीत नाहीत. उलट संबंधीत अधिकारी अधीमधी पाहुणचार घेऊन जातात असे खुद्द मिठाई, हॉटेल्स व अन्य पदार्थांचे दुकानदार सांगतात. मागील महिन्यात शहरातील एका प्रसिद्ध मिठाई दुकानावर कारवाई केली, ही कारवाई सुद्धा साशंक ठरली. आजही अनेक मिठाईच्या दुकानांत निकृष्ट मिठाई मिळते. स्वच्छता पाळली जात नाही. काहींच्या मिठाईला मुंग्याही ढुंकून शिवत नाहीत, या गंभीर बाबींकडे कोणीच लक्ष देत नाही. काहींच्या हॉटेल्स पदार्थांना गुणवत्ता नाही, हेही वारंवार समोर आले. तक्रारींबाबत अन्न प्रशासन पेण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लुटूपुटूची चौकशी करून कारवाई केली. त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असे काही हॉटेल्स, स्वीट मार्टवाले, चायनीज, बिर्याणी विक्रेते वागत आहेत. यातच आरोग्याला अपायकारक बिर्याणी विकणे प्रसिद्ध बिर्याणी विक्रेत्याने सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आता बहुचर्चेत असलेल्या तीनबत्ती नाक्याच्या सामोरील त्या बिर्यानी विक्रेत्यावर कारवाई करणार कोण ? अशी विचारणा होत आहे. दरम्यान, रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्यास अपायकारक बिर्यानी कोण विकतो, याची माहिती घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी झाली आहे, आतातरी आरोग्य विभाग चर्चेतील बिर्याणी विक्रेत्यावर नेमकी काय कारवाई करतो ? हे समोर येणार आहे.

Exit mobile version