अनेक बकर्या व जनावरे मारली; वनविभागातर्फे सावधानतेचा इशारा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात घोटवडे तसेच मानखोरा विभागात बिबट्याचा वावर असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिक लोकांकडून वन विभागाकडे तक्रार आल्याने तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी वन विभागातर्फे सावधानतेचा इशारा व खबरदारीचे उपाय सांगण्यात आले असून, त्या स्वरूपाचे फलकदेखील लावण्यात आले आहेत.
सुधागड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी तरसे तसेच वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी विकास तरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन या विषयाची माहिती घेतली असता, ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की, या परिसरात बिबट्या फिरत आहे. त्यामुळे आमच्या बकर्या, गुराढोरांना धोका आहे. आमची जनावरे व बकर्या बिबट्याने मारल्या आहेत. वनविभागाने त्यानुसार दखल घेऊन मागील चार दिवसांपासून उपायोजना चालू केली आहे. अश्विनी तरसे या स्वतः गेल्या चार दिवसांपासून या विभागात दिवसा व रात्री चार वेळा गस्त मारत आहेत. तसेच वनपाल व वनरक्षक यांची टीम या विभागात गस्त घालण्यासाठी कार्यरत ठेवली आहे. तसेच रात्री बिबट्या गावात येऊ नये म्हणून वनरक्षकांकडे फटाके देऊन परिसराच्या आजूबाजूला रात्री 10, 11, 12 दरम्यान फटाके वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बिबट्या शिकारीसाठी गावात न येता लांब पळून जाईल, त्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
ही घ्या खबदारी
वन विभागाने सांगितले आहे की, खबरदारीचे उपाय म्हणून रात्री घराबाहेर पडू नका, आवश्यक असल्यास गटा-गटांनी हातात काठी, बॅटरी घेऊन बाहेर पडा. रात्री कुत्रे जोर जोराने भुंकत असल्यास बिबट्या जवळ असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, कोंबड्या बंद गोठ्यात ठेवाव्यात. बिबट्या सहसा जाणीवपूर्वक माणसावर हल्ला करत नाही. बिबट्याला हाकलण्यासाठी त्याला दगड मारू नये व त्याचा पाठलाग करू नये, ते आपणास धोकादायक ठरू शकते. बिबट्या आल्यास भांडी वाजवा, फटाके वाजवा, जोरजोराने आरडाओरड करा, घराच्या बाजूने रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवावी.
अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक
बिबट्या हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याचे अस्तित्व कमी झाले तर अन्नसाखळीतील इतर प्राण्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बिबट्या हा अनुसूची एकमधील वन्य प्राणी असल्याने या वन्य प्राण्यास शिकार करणे किंवा इजा करणे किंवा शिकारीचा प्रयत्न करणे हा वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 मधील कलम 9 अन्वये गुन्हा आहे.