| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात बनावट नोटांचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली आहे. खारघर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 49 लाख 90 हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. गुरुवारी (दि.24) करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खारघर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत उस्मानभाई दूषप सहा (वय 41, रा. गुजरात) आणि अब्दुल हसन तुर्क (वय 41 रा.गुजरात) या दोघांना अटक करण्यात आली आहे. खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर 2 मध्ये खारघर रेल्वे स्टेशन या ठिकाणी दोन इसम बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली. त्यानुसार खारघर रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला व उस्मानभाई सहा आणि अब्दुल तुर्क या दोघांना बनावट नोटांसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्याकडून 49 लाख 90 हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. तसेच आरोपींकडून 1 लाख 9 हजार पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटा, एक छोटा मोबाईल, ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या बनावट नोटा त्यांनी कोणाला देण्यासाठी आणल्या होत्या व कोठून आणल्या याप्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.