पर्यटकांनो सावधान ! आरोग्यविषयक नियमांचे पालन करा

। श्रीवर्धन । वाताहर ।
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा ओढा सुरु झाला आहे. मात्र या उल्हासात कोरोनाचे आगमन होत नववर्षाला अनारोग्याचे ग्रहण लागू नये, या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. आनंदोत्सव साजरा करताना पर्यटकांनी कोरोनाविषयक आरोग्य निर्बंधांचे यथायोग्य पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, दंडात्मक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणार्‍या दिवेआगर येथ श्रीसुवर्ण गणेश प्रतिमेची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली. यामुळे भाविक आणि पर्यटक यांचा ओढा दिवेआगरच्या दिशेने अधिकच वाढला आहे. त्यातच न्यू इअर सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक श्रीवर्धन, दिवेआगरमध्ये दाखल होत आहेत. परंतू, अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसून, ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या रुग्ण संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे.


या अनुषंगाने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन तालुक्यात नववर्षाच्या स्वागतासाठी येणार्‍या पर्यटकांवर प्रशासनाने आता करडी नजर ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाचा प्रसार अथवा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या सूचनेनुसार दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून विनापरवाना पार्ट्या आयोजित करणार्‍यांबरोबरच कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणार्‍या आयोजकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने वाहतूक देखील सुरळीत व्हावी तसेच समुद्रकिनारी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यासाठी अतिरिक्त पोलीसबळ श्रीवर्धन तालुक्यात दाखल होणार आहे.

Exit mobile version