| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांचे श्रीवर्धन येथे यथोचित स्मारक उभारण्यासाठी आता केंद्राला आवाहन करण्यात आले आहे. यासाठी भाजपा रायगड, दक्षिण रायगडचे जिल्हा चिटणीस मनोज गोगटे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना एक पत्र लिहून श्रीवर्धन येथे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मस्थानी स्फूर्तिस्थान बनवावे अशा आशयाचे पत्र लिहून या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
श्रीवर्धन परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर पेशवे स्मारकाच्या जागेत 1988 मध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर गेल्या अनेक वर्षात या ऐतिहासिक वास्तुमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. तरी या स्थळाचे ऐतिहासिक महत्व ओळखून पुढच्या पिढीला व पर्यटकांना पूर्ण माहिती उपलब्ध व्हावी यासाठी सदर जागेमध्ये श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे उचित व भव्य स्फूर्तिस्थान होणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे.