। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मापगाव परिसरात एका 50 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी ( दि.2) सायंकाळी घडली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करणारा फरार असून पोलीस त्याच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विजय थळे (बाबू) असे मृत व्यक्तीचे नाव असून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तालुका अध्यक्ष सुनील थळे यांचे ते धाकटे बंधू होत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मापगाव परिसरातील टाकादेवी मंदिरानजीक असलेल्या दगडाच्या खाणीजवळ जेसीबीच्या सहाय्याने धडक देऊन जखमी केले. त्यामध्ये विजय थळे अर्थात बाबू यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वादाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र मारेकर्यांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विजय थळे यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून मारेकरांना तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. विजय थळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात सायंकाळी आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.





