खड्ड्यातील पाणी वापरण्याची वेळ
| ठाणे | प्रतिनिधी |
पावसाळा संपला तरी जव्हार तालुक्यातील भागडावासीयांवर खड्ड्यातील पाणी वापरण्याची वेळ आली आहे. या गावात ग्रामपंचायतीने बांधलेली विहीर तीन वेळा दुरुस्त करण्यात आली. तरीदेखील या विहिरीला थेंबभरदेखील पाणी आले नाही. त्यामुळे येथील माता, भगिनींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.
जव्हारपासून 20 किलोमीटर अंतरावर भागडा गाव असून दरवर्षी पाण्याचा प्रश्न स्थानिकांना भेडसावतो. काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने विहीर बांधली. परंतु, निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे विहिरीची दैन्यावस्था झाली. त्यामुळे एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा त्याची दुरुस्ती करावी लागली. या दुरुस्तीवरसुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यात आला. पण तरीही या विहिरीला पाणी लागले नाही. त्यामुळे या गावातील लहान मुले व महिला खड्ड्यातीलच पाणी रोज घरी आणत आहेत.
सरकारी पैशातून भागडा गावात विहीर बांधली. पण ठेकेदाराने मनमानीपणे काम केले. थोड्याच दिवसात विहीर खराब झाली. ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या गावातील निकृष्ट विहिरीबाबत तक्रार आली असून यासंदर्भात संबंधित विभागाला योग्य ते आदेश दिले आहेत, असे गटविकास अधिकारी डी. एस. चित्ते यांनी सांगितले आहे.




