। सांगोला । विशेष प्रतिनिधी ।
जे पक्ष दिल्लीच्या मैदानावर एकत्र आले ज्या पक्षांनी शेतकरी कायद्या विरोधात पाठिंबे दिले आपल्या सोबत बसले. त्यांनीच नंतर दुटप्पी भुमीका घेतली. त्यांनी शेतकरी कायदे रद्द करण्याची भुमीका न घेता दुरुस्ती करण्याची भुमीका घेतली ती न पटण्यासारखीच आहे. ज्यांना मते दिली त्यांनी गद्दारी केली. त्यांना धडा शिकविणार. राजकारणातून नेस्तनाबूत करुनच विजय मिळवणार. मनात हि चिड निर्माण झालेली आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या डोळयात दिसते. आपल्या सोबत जी गद्दारी झाली आहे त्याचा बदला घेणारच असा आक्रमक इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिला.
शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती समितीच्या सांगोला येथील बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या आक्रमक भाषणात जयंत पाटील यांनी शेकापक्षाच्या जिवावर अस्तित्व टिकवून नंतर गद्दारी करणार्यांवर नाव न घेता चौफर हल्ला चढविला. ते म्हणाले. पराभव आमच्यासाठी नवीन नाही. ज्या ज्या वेळी शेतकरी कामगार पक्षाचा पराभव झालाय, त्या त्या वेळीअधिक त्वेषाने आम्ही उभे राहिलो आहोत. प्रत्येक वेळी पराभव झाल्यानंतर आम्ही आत्मचिंतन करतो, झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे काम करतो. मध्यवर्ती समितीच्या बैठकीला तरुण कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहिले हे पक्षसंघटनेच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. लढायचंय, जिंकायचंय आणि टिकायचंय तर परिवर्तन करणे गरजेचे आहे. आबासाहेब काय होते आणि त्यांनी काय केले हे सांगण्याची गरज नाही. सांगोल्याची वेगळी परंपरा आहे. प्रभावी कार्यकर्त्यांचा वक्तशिर पाहिला तर सांगोल्यातून आपण निश्चितच आमदार पाठवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आबासाहेबांच्या आठवणी सांगताना जयंत पाटील भावूक झाले. ते म्हणाले, सांगोल्याचे आबासाहेब नव्हे तर आबासाहेबांचा सांगोला असं सरकारला सांगावं लागलं याच्यापेक्षा मोठी अभिमानास्पद गोष्ट असूच नाही. शेकापक्षाने लढून संघर्ष करुन सांगोल्यात पाणी आणलं. त्यावेळी पाणी आणण शक्य नव्हतं, पाणी पुढं सरकत नव्हतं. पण त्यासाठी नितीन गडकरी यांनी मदत केली. जे खरं आहे ते नेहमी शेकापक्ष स्विकारतो. शेकापक्ष खोटं कधी बोलत नाही. सत्ता नसतानाही पाणी आणण्याचे काम गणपतराव देशमुख यांनी केले आहे. आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आज अनेक कार्यकर्ते घडले आहेत. आबासाहेबांचे कार्य किती मोठे होते ते राज्यालाच नाही तर देशालाही माहीत आहे. पाणी आणल्याशिवाय मरणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली होती. ती त्यांनी पुर्ण करुन दाखवली. विदर्भात कापूस उत्पादन होत असून आशिया खंडातील सर्वात मोठी सुत गिरणी सांगोल्यात आहे ही देखील मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. आबासाहेब मंत्री झाले त्यावेळी त्यांनी सांगितले की खातं कोणतेही असो ते मोठे करण्याचे काम आपले आहे. त्यानंतर त्यांना मिळालेले खाते मोठे करुन दाखविले. रायगड जिल्ह्यात जे शेततळे योजना राबविली गेली त्याचे उगमस्थान आबासाहेब आहेत. कोण नेतृत्व करणार हे महत्वाचे नाही सांगोल्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा आमदारच आहे.
तरुणांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी राजकारण बदलंलय तरुणांनी अभ्यास करण्याची गरज आहे. नवीन कायदे शिकण्याची गरज आहे. जे पक्ष दिल्लीच्या मैदानावर एकत्र आले ज्या पक्षांनी शेतकरी कायद्या विरोधात पाठिंबे दिले आपल्या सोबत बसले. त्यांनीच नंतर दुटप्पी भुमीका घेतली. त्यांनी शेतकरी कायदे रद्द करण्याची भुमीका न घेता दुरुस्ती करण्याची भुमीका घेतली ती न पटण्यासारखीच आहे. सांगोल्यातील कार्यकर्ते खंबीर कार्यकर्ते आहेत. आबासाहेबांच्या तालमीत घडलेले बुलंद आवाजाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना काहीच शिकवण्याची गरज नाही. ज्यांना मते दिली त्यांनी गद्दारी केली. त्यांना धडा शिकविणार. राजकारणातून नेस्तनाबूत करुनच विजय मिळवणार. मनात हि चिड निर्माण झालेली आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या डोळयात दिसते. आपल्या सोबत जी गद्दारी झाली आहे त्याचा बदला घेणारच अशी गर्जनाही त्यांनी यावेळी केली.
आप्पासाहेबांचे देखील काम मोठे आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच यापुढे काम करणार. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्यावर आत्मचिंतन करणार. शेकापक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता वेगळा आहे. आणि प्रत्येक कार्यकर्तयाचे वेगळे असे काम आहे. यापुर्वी सांगोला तालुका हा पोर्ट, कुलाबा, जेएनपीटी यासारख्या कंपन्यामध्ये माथाडींचा तालुका अशी त्याची ओळख होती, मात्र आज हा तालुका सुजलाम सुफलाम झालाय याचे सारे श्रेय हे आबासाहेबांचेच आहे. आज प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरासमोर गाड्या आहेत. त्यांनी मेहनत घेतली त्यांचे योगदान असले तरी तरी कल्पना आबासाहेबांचीच होती. फळ उदयोग सोडून कारखाने उभे करण्याला त्यांनी नेहमीच विरोध केला. फळ उत्पादन करुन उसापेक्षा जास्त उत्पादन कसे मिळेल याचा त्यांनी नेहमीच विचार केला. माणूस संपतो पण विचार संपत नाही. सांगोला हा एकमेव असा तालुका आहे. ज्या तालुक्यातील सर्व सहकारी संस्था, सामाजिक संस्था नफयात आहेत. हे साम्राज्य सांभाळून ठेवा. भविष्यात सांगोल्यात शेती उद्योग करण्याचा विचार आहे.
आपल्याला योजना बदलायच्या आहेत. कायदे जनतेच्या हितासाठी आहेत. कायदे करताना शेकापक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय सरकार करु शकत नाही. ही प्रक्रीया नव्या कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. शेकापक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सर्वसामान्यांचा रक्षणकर्ता असायला हवा. जनतेच्या हिताचा त्यांनी विचार करायला हवा. शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचे कौटूंबिक नाते आहे. पिढयानपिढया हे नाते सुरु आहे. आबासाहेबाचां इतिहास कोणीही पुसू शकत नाही. मात्र आता नवा इतिहास घडवायचा आहे. आक्कासाहेबांचे सर्वांनी ऐकायचे आहे. आक्कासाहेबांनी सांगावं. देशमुख कुटूंबांनी त्यांची भुमीका मांडावी, कार्यकर्ते तसेच मध्यवर्ती समीती त्याला निश्चितच पाठिंबा देईल. आपली भुमीका ठाम असायला हवी असेही त्यांनी नमुद केलेत्र
येत्या निवडणूकीत शेकापक्ष आपले काम दाखवून देणार. महिलांना संधी आहे. राज्यातील शेकापक्षाचे मार्गदर्शक प्रा. एस व्हा जाधव यांच्या पुढाकारातून सर्व पुरोगामी पक्ष एकत्र आणू पाहतोय. या बैठकीच्या निमित्ताने कायकर्त्यांच्या मनातील चिड दिसली. शत्रूने समारुन वार करणे अपेक्षित आहे. मात्र आपल्या पाठित खंजिर खूपसणार्याला आपण शत्रुही म्हणू शकत नाही. या सार्याचा बदला घ्यायचा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची फसवणूक झाली आहे. त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाबाबत सर्वच खोटे बोलतात. कायदे बदलायची भुमीका आबासाहेबांनी शिकवली. यापुढे जे कायदे पटणार नाहीत त्याबद्दल ठाम भुमीका घेतली जाईल. आता किल्ली मुलांकडे देण्याची वेळ आली आहे. त्यासाठीच ही मध्यवर्ती आहे. आबासाहेबांची सरकारी कामात भविष्यात उणिव भासू देणार नाही. त्यासाठी तीन महिन्यानंतर पुन्हा येऊन समस्या जाणून घेऊन सरकारपर्यंत पोहचविणार. सांगोल्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा नेता आहे. त्यामुळे येणार्या निवडणूकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी बदला घेण्याची भुमीका ठाम घ्यावी. आम्ही पुरोगामी की प्रतिगामी आहोत हे आमचे आम्ही ठरवू. विरोधकांनी हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही असेही शेवटी बजावण्यास आ. जयंत पाटील विसरले नाहीत.