भारतमाता की जय चा अलिबागेत जयघोष

चांद्रयान मोहिमेचे कौतुक

| रायगड | आविष्कार देसाई |

नेहमी वाहनांच्या गर्दीने गजबजून गेलेल्या अलिबागमधील शिवाजी चौकात बुधवारी सायंकाळअलिबागकरांनी फुलून गेलेली होती. टाचणी पडली तरी आवाज होईल, अशी शांतता पसरली होती. कमालीची उत्सुकताही लागली होती. साऱ्यांच्या नजरा जोगळेकर नाक्यावर लागलेल्या स्क्रीनकडे होत्या. तो ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये पकडणाऱ्या मोठ्या पडद्याकडे साऱ्यांचे मोबाईल कॅमेरे ऑनदेखील झाले होते. अन्‌‍ तो क्षण आला आणि क्षणार्धातच अवघा शिवाजी महाराज चौक ‌‘भारत माता की जय’च्या जयघोषांनी दुमदुमून गेला. निमित्त होते भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या थेट प्रक्षेपणाचे.
चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा भारताचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. हा ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अलिबागकरांनी शिवाजी चौकात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. चांद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. ‌‘भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. फटाक्यांच्या आतषबाजीने निरभ्र आकाश लखलखून गेले. नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

सकाळपासूनच चांद्रयानबाबत प्रत्येक भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चांद्रयान हे 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी उतरणार असल्याचे इस्त्रोने जाहीर केले होते. या मोहिमेच्या थेट प्रक्षेपणाची सोय महाराष्ट्र प्रदेशचे सचिव ॲड. प्रवीण ठाकूर यांनी अलिबाग शहरातील शिवाजी चौकात केली होती. अलिबागकरांना प्रक्षेपण पाहता यावे यासाठी स्क्रीनची व्यवस्था केली होती. नागरिकांनी याची माहिती मिळत होती, तसे ते शिवाजी चौकात धाव घेत होते. यामध्ये आबालवृद्ध, युवक आणि महिलांचा चांगला सहभाग असल्याचे दिसून आले.

चांद्रयान चंद्रावर उतरण्याच्या काही क्षण आधी सर्वांचीच धाकधूक वाढली होती. उतरण्यासाठी योग्य जागा उपलब्ध न झाल्यास चांद्रयान 27 ऑगस्ट रोजी उतरवण्याची तयारी इस्त्रोने केली होती. मात्र, ठरलेल्या वेळेनुसार चांद्रयान यशस्वीपणे उतरले. त्यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. आयोजकांनी पेढे वाटून इस्त्रोच्या कार्याचा गौरव केला.

चांद्रयान यशस्वीपणे उतरेल याची खात्री होती आणि तसेच झाले. इस्त्रोच्या कार्याला सलाम.

मानस कुंटे, युवक

रशियाचे लुना-25 हे उतरण्याआधीच कोसळले होते. त्या तुलनेत भारतीय शास्त्रज्ञांची कामगिरी अफलातून आहे.

राहुल साष्टे, व्यावसायिक

भारतीयांमध्ये प्रचंड प्रमाणात क्षमता आहे हे पुन्हा एकदा इस्त्रोने सिद्ध केले आहे, असे स्वाती सोनवणे या गृहिणीने सांगितले. भारतीयांची छाती अभिमानाने आज फुलली आहे. आजचा क्षण आमच्या पिढीला अत्यंत प्रेरणादायक आहे.

अक्षय देशमुख, युवक

अपूर्वाचे पेढे वाटप
2019 साली मिस टीन युनिवर्स हा किताब मिळवणाऱ्या अपूर्वा ठाकूर हिने उपस्थितांना पेढे वाटले. प्रत्येक भारतीयांसाठी हा अमूल्य क्षण असल्याचे तिने सांगितले.

Exit mobile version