भास्कररावांचे तटकरेंना पुन्हा आव्हान रायगडला माझी ताकत दाखवता

| तळा | वार्ताहर |
खा.सुनील तटकरे आणि शिवसेना आम.भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रृत आहे. आता सुद्धा तळा नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात भास्कर जाधव यांनी थेट तटकरेंवरच हल्लाबोल करीत खुले आव्हान दिले.
महाराष्ट्रात काम करण्यासाठी मला कोणत्या जिल्ह्याची निवड करायची झाली तर मी रायगड जिल्ह्याची निवड करेन.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला संघटनात्मक काम करण्यासाठी रायगड जिल्हा दिला तर मग मी माझी ताकत दाखवतो असा इशारा आ. भास्कर जाधव यांनी खा. सुनील तटकरे यांचे नाव न घेता दिला.
तळा नगरपंचायत निवडणुकिसाठी उभ्या असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ही सभा शहरातील बळीचा नाका येथे होणार होती त्यासाठी शिवसैनिकांनी नगरपंचायतीची परवानगी देखील घेतली होती. परंतु ऐनवेळी कोरोना प्रदूर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येऊन ही परवानगी नाकारण्यात आल्याने सदर सभा स्टेट बँकेच्या वरती असलेल्या मंगलकार्यालयात घेण्यात आली. याबद्दल नाराजी व्यक्त करताना आ. जाधव यांनी सांगितले की जाहीर सभा रद्द करून तुम्ही शिवसैनिकांना दडपू शकत नाही.शिवसैनिकांचा आवाज दाबू शकत नाही किंबहुना जर खर्‍या शिवसैनिकांची ओळख तसेच खर्‍या शिवसैनिकांचे तेज बघायचे असेल तर ज्या ज्या वेळी शिवसैनिकांना अडचण निर्माण केली जाते. त्या त्या वेळी शिवसैनिक हा तेजाने पेटून उठतो. मग मात्र त्याला आवरण कठीण जाते.म्हणून मला विरोधकांना सांगायचे आहे की आचारसंहिता ही संपून जाईल परंतु जाणीवपूर्वक तुम्ही शिवसैनिकांना त्रास देत असाल तर गाठ शिवसेनेशी आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ईशारा दिला.
यावेळी आ. भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात म्हटले की खा.तटकरे स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणवितात मग त्यांना घरोघरी जाऊन मते मागण्याची वेळ का येते.तुम्ही जर जनतेची कामे केली असतील तर जनता तुम्हाला निवडून देईल परंतु केवळ आश्‍वासने देऊन मते मिळत नाहीत त्यासाठी जनतेची कामे करावी लागतात. असा टोला आ. गोगावले यांनी खा.सुनील तटकरे यांना लगावला.तसेच तळा,म्हसळा,माणगाव आणि पोलादपूर नगरपंचायतीवर शिवसेनेचीच सत्ता येईल असा विश्‍वास देखील व्यक्त केला.

Exit mobile version