। मुंबई । वृत्तसंस्था ।
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांचा मोठा गट पक्षातून फुटून निघाल्यानंतर शिंदेंनी भरत गोगावले यांची पक्षाच्या प्रतोदपदी नियुक्ती केली. यामुळे शिवसेनेला विधानसभेत बहुमत चाचणीवेळी आणि अध्यक्ष निवडणुकीवेळी मोठ्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी करत खासदार राजन विचारे यांची पक्षाच्या लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेलं पत्र सध्या व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू होण्याच्याही आधी भावना गवळी ईडीच्या रडारवर होत्या. त्यांना ईडीकडून नोटीस देखील बजावण्यात आली होती. सध्या एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ईडीची भिती दाखवून तिकडे वळवण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत देखील शिवसेनेला विधानसभेप्रमाणेच पेचप्रसंगाचा सामना करावा लागू नये, यासाठी खबरदारी म्हणून शिवसेनेनं हे पाऊल उचलल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे